बुलढाणा, दि.१४। प्रतिनिधी अधिवेशनात मग्न असलेले सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच करीत नसल्याच्या निषेधार्थ “स्वाभिमानी’ ने चक्क स्मशानभूमीत आंदोलन सुरू केले आहे. येत्या बारा तासांत शेतकरी हिताचे निर्णय घ्या, अन्यथा स्मशानातच गळफास लावून घेणार असा टोकाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. यामुळे प्रशासनासह पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असून अधिवेशनात व्यस्त सरकार काही कृती करते काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डीक्कर यांच्या नेतृत्वाखालील हे अभूतपूर्व “गळफास आंदोलन’ करण्यात येत आहे. संग्रामपूर तालुक्यातील निरोड या गावातील स्मशानभूमीत हे आंदोलन सुरू आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना डीक्कर म्हणाले की, गेल्या १० ते १२ दिवसापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मात्र तिथे शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकरी हिताचे कुठलेही निर्णय घेण्यात आले नाही. दररोज कुठल्या ना कुठल्या अधिकारी, कर्मचारी यांचा संप सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा जगून काहीही फायदा नाही, अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. यामुळे शेतकऱ्यांनी आज संग्रामपूर तालुक्यातील निरोड बाजार येथील स्मशानभूमीमध्ये गळफास आंदोलन पुकारले आहे. येत्या १२ तासात सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही, तर आम्ही स्मशानभूमीतच गळफास घेत जीवन संपविणार असल्याचे डीक्कर यांनी सांगितले.