नवी मुंबई, दि.१५। प्रतिनिधी वेगाने विकसित होत असलेले नवी मुंबई शहर आज हादरलं. नेरूळ येथे कारने जात असताना बांधकाम व्यावसायिकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू झाला. सावजी पटेल असे या बांधकाम व्यावसायिकांचे नाव आहे. नवी मुंबई पोलिसांकडून अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. नेरूळ येथे सावजी पटेल हे आपल्या कारमधून जात असताना एका दुचाकीवर आलेल्या दोघा मारेकऱ्यांनी आपल्या पिस्तूल मधून तीन गोळ्या झाडल्या. गोळ्या त्यांच्या छातीत आणि पोटात लागल्या. पटेल यांचा घटनास्थळीच गाडीतच मृत्यू झाला. व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. मात्र हत्येचे नेमके कारण अद्यापही समोर आले नसल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली.
सावजी पटेल हे आपल्या कारने नेरूळ येथून जात असताना दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर पिस्तूल रोखले आणि गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज झाल्याने भयभीत झालेल्या नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षात याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना कारमध्ये सावजी पटेल यांचा मृतदेह आढळला. पोलिसांना घटनास्थळी तीन रिकामी काडतूस सापडले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. आता, पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. या घटनेने अनेक वर्षानंतर नवी मुंबई पुन्हा हादरली आहे.
बांधकाम व्यावसायिकाची हत्या झाल्याने पोलीस देखील सतर्क झाले आहे. यापूर्वी देखील नवी मुंबई शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या भीषण हत्या प्रकरणं चांगलीच गाजली आहेत. सुमारे पंधरा वर्षापूर्वी वाशी येथे दीपक वालेचा, एन आर संकुल निर्माण करणारे डी. एस. राजन यांच्या हत्या झाल्या होत्या. अतुल अग्रवाल यांच्यावर गोळीबार झाला आहे. तर एस के बिल्डर्स या बड्या बिल्डरची हत्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या हत्या प्रकरणात चकमक फेम पोलीस अधिकाऱ्याचे नाव आल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली होती.