मुंबई, दि.१६। प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि जावयाला जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी ठाणे महापालिकेचे वादग्रस्त साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागा (सीआयडी) मार्फत स्वतंत्र चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. राज्यात अशा प्रकारे कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला तर तो सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. गृह खात्याच्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना आव्हाड यांनी महेश आहेर यांच्या कथित कारवाया सभागृहात मांडत ठाणे ही गुन्ह्यांची राजधानी (क्राईम कॅपिटल) बनल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना फडणवीस यांनी आहेर यांची सीआयडीच्या विशेष अधिकाऱ्यामार्फत स्वतंत्र चौकशी केली जाईल. तसेच आहेर यांची शैक्षणिक पात्रताही तपासली जाईल, असे सांगितले.
आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देतानाच कोणीही अशी धमकी दिली, तर ते सहन केले जाणार नाही. तसेच अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई केली जाईल असेही फडणवीस यांनी सांगितले. तत्पूर्वी आहेर यांनी आपल्या कुटुंबाला संपविण्याची धमकी दिल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. ठाण्यात जर एका आमदाराच्या मुलीला आणि जावयाला मारण्याची धमकी दिली जात असेल आणि धमकी देणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नसेल तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल, असा उद्विग्न सवाल केला. यावेळी आव्हाड यांना भावना अनावर झाल्या होत्या. महेश आहेर याने दिलेल्या धमकीची ध्वनिफीत आपल्याकडे असून माझ्या मुलीला आणि जावयाला मारण्याची धमकी दिली आहे. जे जे हत्याकांडातील मुख्य आरोपी सुभाषसिंग ठाकूर याच्याशी आपले संबंध असल्याचे आहेर सांगतो. मात्र, सरकारकडून काहीही कारवाई होत नाही. साधी एक तक्रारही नोंदवली जात नाही. ही एका आमदाराची अवस्था आहे, असे आव्हाड यांनी सांगितले. आहेर यांच्या शिक्षणाची माहिती गेल्या पाच वर्षांपासून मागत आहे. आयुक्तही हे प्रमाणपत्र देत नाहीत. हा अधिकारी आपले दिवसाचे उत्पन्न ४० लाख रुपये आहे असे सांगतो.