फडणवीसांचा फेरा !

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध एका गुन्हेगाराच्या मुलीने ज्या पद्धतीने कट रचला तो पाहिल्यास सर्वांच्या तोंडात आपोआपच बोटे गेली असतील. ज्या मुलीला या प्रकरणी अटक करण्यात आली, तिचा बाप कुख्यात बुकी आहे. अशा बापाची मुलगी इतक्या दिवसांपासून अमृता फडणवीस यांच्याकडे कामाला होती. कोणत्याही प्रकारे स्वप्नातही कल्पना करता येणार नाही अशा पद्धतीने त्या गुन्हेगार महिलेने कट रचला.

आपल्या बापाविरुद्ध अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे, त्यातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मदत करावी, असा कुविचार त्या मुलीच्या मनात आला. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा स्वच्छ रजनेता अशी आहे. कोणत्याही परिस्थितीत देवेंद्र फडणवीस व त्यांचे कुटुंबीय अशा प्रकारचे कृत्य करू शकत नाहीत हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते.

आधी लाच देण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी ठरवून बॅगेत नोटा भरतानाचा व्हिडिओ तयार करणे आणि तीच बॅग अमृता फडणवीस यांच्या बंगल्यात काम करणाऱ्या महिलेला देतानाचा फोटो व्हायरल करणे हे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आरोपी महिलेने अगदी ठरवून केलेले दिसते. अशा प्रकारे बदनामीच्या जंजाळात उपमुख्यमंत्र्यांना अडकवण्याचे हे प्रकरण एवढ्यापुरते मर्यादित नाही. यामागे उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा मोठा प्रयत्न दिसून येतो. फडणवीस यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या सतर्कतेमुळे त्या बदमाश महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले आणि आता तिची रवानगी पोलीस कोठडीत झाली आहे. हे प्रकरण साधेसुधे नाही. राजकारणात बदनाम करण्यासाठी कसे कसे डावपेच रचले जातात त्याचा हा लांच्छनात्मक नमुना आहे.

आरोपी बाई ज्या हडेलहप्पी पद्धतीने अमृता फडणवीस यांच्याकडे पैसे देण्याचा प्रयत्न करताना दिसते, त्यावरून तिचा इरादा किती घाणेरडा आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. कोणत्याही प्रकारे या घटनेपासून देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा कट रचणाऱ्या ज्या ज्या शक्ती असतील त्यांचा छडा लवकरच लागेल आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल याबद्दल शंका बाळगायचे कारण नाही.

हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. अतिशय बदनामीकारक आहे. आणि ज्या पद्धतीने हे कटकारस्थान रचले त्यामागे निश्चितपणे गुन्हेगारी डोके आहे यात वाद नाही. या प्रकरणातून आपल्या स्वाभाविक जीवनातील वागणुकीवर कसा परिणाम होत आहे आणि ते समाजासाठी किती घातक आहे, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. वेळीच फडणवीस कुटुंबाने सावधानता बाळगल्यामुळे हे प्रकरण कट करणाऱ्यावर उलटले आणि फडणवीस कुटुंब तावूनसुलाखून बाहेर पडले, याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *