नवी दिल्ली, दि.१७। वृत्तसंस्था दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. सिसोदिया यांनी सरकारी अधिकारपदाचा गैरवापर करून आणि दिल्ली सरकारच्या “अभिप्राय विभागाचा’ वापर करून राजकीय हेरगिरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
सिसोदिया यांना सीबीआयने यापूर्वीच अबकारी शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीप्रकरणी अटक केलेली असून ते सध्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत आहेत. सिसोदिया आणि सुकेश कुमार जैन, कुमार सिन्हा, प्रदीप कुमाहर पुंज, सतीश खेत्रपाल, गोपाल मोहन या अन्य पाच जणांविरोधात गुन्हेगारी कट रचणे, गुन्हा करण्याच्या हेतूने विेशासघात करणे, बनावटीकरण आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीअंतर्गत मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
यापैकी कुमार सिन्हा हे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांच्या विशेष सल्लागार, तर गोपाल मोहन हे केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारविरोधी कक्षाचे सल्लागार म्हणून काम पाहत होते. या प्रकरणी केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध संस्थांच्या कामाशी संबंधित माहिती आणि कार्यवाही करण्याजोगा अभिप्राय संकलित करण्यासाठी आम आदमी पक्षातर्फे अभिप्राय विभाग स्थापन करण्यात आला होता. मात्र याचा राजकीय हेरगिरी करण्यासाठी गैरवापर करण्यात आला, असा सीबीआयचा आरोप आहे.