मुंबई, दि.१७। प्रतिनिधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पोर्शभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा शुक्रवारी कर्नाटकच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. १७ मार्च रोजी ते बेल्लारी येथे रोड शो केल्यानंतर निवडणूक रॅलीला संबोधित करतील. राज्यातील निवडणुकीच्या तयारीबाबत नड्डा आज संघटनेची बैठकही घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. १८ मार्च रोजी नड्डा यांनी पक्ष प्रचार समिती आणि पक्ष निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक बोलावली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. नुकतेच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार ३ दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर होते. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते येथे आले होते. पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी २५ मार्चला कर्नाटकला भेट देऊ शकतात. दोन महिन्यांतील त्यांचा हा सातवा कर्नाटक दौरा असेल. याआधी गेल्या रविवारी पंतप्रधान मोदी मंड्या आणि हुबळी-धारवाडला पोहोचले होते.
पंतप्रधानांनी आधी काँग्रेस-जेडीएसचा बालेकिल्ला असलेल्या मंड्यामध्ये रोड शो केला आणि त्यानंतर जाहीर सभेला संबोधित केले. पंतप्रधान मोदींच्या कर्नाटक दौऱ्यापूर्वी, गृहमंत्री अमित शहा २३ आणि २४ मार्च रोजी कर्नाटकमध्ये निवडणूक सभा, रॅलींना संबोधित करतील. यासोबतच ते पक्षाच्या बैठकीत भाजप नेत्यांना विजयाचा मंत्रही देणार आहेत.कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत भाजप प्लॅन ५बीच्या भूमिकेत असेल. त्याअंतर्गत कर्नाटकात ५ जिल्हे येतात. यामध्ये एकूण ७२ जागा आहेत. या पाच जिल्ह्यांमध्ये बंगळुरू, बेळगाव, बागलकोट, बिदर आणि बेल्लारी यांचा समावेश आहे. २०१८ मध्ये या जिल्ह्यांतून केवळ ३० जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी भाजपने येथे कोणतीही चूक करायची नसून त्यासाठी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.