आपल्या हाती जेव्हा हा अंक येईल तेव्हा ‘महासागर’च्या मूळ आवृत्तीला ५२ वर्षे झालेली असतील. १९७१ला गुढीपाडव्याच्या शुभदिनी उभारलेली महासागरची ही गुढी ५२ वर्षांत आम्ही फारशी कोमेजू दिली नाही.
ज्या काळात वृत्तपत्र प्रकाशित करणे आजच्याएवढे सोपे नव्हते त्या काळापासून महासागरचा संसार सुखाने चालावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ५२ वर्षांपूर्वी लावलेले रोपटे आता चांगलेच बहरले आहे. या ५२ वर्षांच्या काळात महासागरला अनेक प्रथितयश पत्रकार आणि लेखकांचा सतत सहवास लाभला. त्या सर्वांचा उल्लेख करणे या छोट्याशा ‘खरीखरी’त शक्य नाही. १९७४ साली कविवर्य सुरेश भट यांना अमरावतीहून नागपूर येथे आणून त्यांना महासागरच्या कार्यकारी संपादक पदावर बसवण्याचे कार्य करता आले. त्यापूर्वी व त्यानंतर महासागरला अत्यंत कठीण काळात सहकार्य करणारे सहकारी लाभले होते त्यामुळे त्याचा आम्हाला गौरव वाटतो.
विदर्भातील अनेक नामांकित पत्रकारांनी आली कारकीर्द महासागरमधून सुरू केली होती, असे ते आवजर्ून सांगतात. ज्या काळात वृत्तपत्राचा संसार चालविणे जिकिरीचे होते अशा काळात नागपूरनंतर अकोला, अमरावती व चंद्रपूर येथून खिळ्याच्या साहाय्याने जुळणी करून अनेक आवृत्त्या प्रकाशित करणारे महासागर हे पहिले वृत्तपत्र होते. अतिशय कमी साधनसामग्रीत नियमित दैनिकाचे प्रकाशन करणे यासाठी जी तारेवरची कसरत करावी लागली होती त्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभत गेले हे आम्ही वर नमूद केलेच आहे.
१९७६ साली तत्कालीन मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांनी अर्ज देताच महासागरला सरकारी जाहिरात यादीवर घेतले होते त्यामुळे पुढील वाटचाल सोपी होऊ शकली. पुढच्या काळात आमचे मित्र गिरीश गांधी यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केले. त्यांच्या ऋणाचा बोजा अजूनही आमच्या डोक्यावर कायम आहे. ४-५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर असताना सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वृत्तपत्रांच्या जाहिरातदरात मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे अनेक वृत्तपत्रांचे संसार उभे राहू शकले आहेत. जर देवेंद्रजींनी दरवाढ दिली नसती तर महाराष्ट्रातील कितीतरी वृत्तपत्रे बंद पडली असती. महाराष्ट्राच्या वृत्तपत्रसृष्टीवर त्यांनी निश्चितच फार मोठा मदतीचा हात दिला आहे, हे मान्य केलेच पाहिजे. सर्व सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही, हे वेळोवेळी सर्वांनाच अनुभवावयास येते.
या ५२ वर्षांच्या महासागरला जिवंत ठेवून होता होईल तेवढा विकास करण्याचे कार्य आम्ही इमानेइतबारे केले. आता विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांतून निघणारे महासागर हे एकमेव दैनिक आहे. याशिवाय मुंबई, पालघर-ठाणे आणि नाशिक या आवृत्त्या बऱ्यापैकी वाटचाल करत आहेत. बाविशीत सुरू केलेला हा पत्रकारितेचा व्यवसाय पंचाहत्तरीतही त्याच उत्साहाने सुरू आहे, हे आमच्या मायबाप वाचकांच्या, जाहिरातदारांच्या मदतीमुळेच शक्य आहे. महासागरवरील आपल्या प्रेमाची पावती आमचे पाठक वेळोवेळी देतच असतात. हेच प्रेम, हीच आपुलकी आमची रोजची शिदोरी आहे. पुढील वर्ष-दोन वर्षात ऋणमुक्त होण्याचा मार्ग दृष्टीक्षेपात आहे. आमच्या हातून जेवढे भलेबुरे लिखाण झाले ते आमच्या वाचकांनी गोड मानून घेतले याचाही आम्हाला आनंद आहे. आजच्या वर्धापनदिनाच्या दिवशी आपल्या प्रेमाची घागर अशीच भरभरून ठेवा एवढीच आग्रहाची विनंती आहे!