आपल्या सरकारने नागपूर ते मुंबई जलद पोहोचण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार केला आहे. या समृद्धी महामार्गावर वारंवार जे अपघात होतात त्यामुळे विनाकारण या बहुउपयोगी मार्गाची बदनामी होत आहे.
या महामार्गावर जाणाऱ्या गाड्यांसाठी १२० कि. मी., १०० कि. मी., ८० कि. मी. आणि बाजूला थांबणाऱ्यांकरता वेगळा मार्ग अशा गतीने प्रवास करणे गरजेचे आहे. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बहुतेक वाहनचालक नियमांचे पालन करत नाहीत त्यामुळे हे अपघात होतात.
या महामार्गावरून आम्ही स्वतः अनेकदा प्रवास केला आहे. ज्या लेनवर १२० कि. मी. प्रति तासाने गाडी चालवायची आहे, त्या लेनवर १५० कि. मी. प्रति तास या गतीने चालणाऱ्या गाड्या आम्ही बघितल्या आहेत. मोठमोठे ट्रक आणि वाहने त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या लेनमधून न जाता जास्त गतीच्या लेनमधून जातात, असे आढळून आले आहे. मार्ग अत्याधुनिक झाले तरी आपली मनोवृत्ती अजूनही जुनीच आहे. त्यात सुधारणा होत नाही. त्यामुळे या अतिशय उत्कृष्ट महामार्गाची विनाकारण बदनामी होते, हे या वेगबहाद्दरांना समजत नाही. वेगमर्यादेचे पालन करणे अत्यंत गरजेचे असते. जी वेगमर्यादा अखून दिलेली आहे त्याचे पालन केल्यावर सर्वसामान्य मर्गापेक्षा २० ते ४० टक्के वेळेची बचत होते.
वारंवार गती कमी – जास्त करण्याची गरज नसल्यामुळे इंधनाची बचत होते ती निराळीच. ज्या गंतव्यस्थानी जायचे आहे त्या ठिकाणी पोहोचल्यावर बाहेर पडल्यावर तुम्हाला टोल द्यावा लागतो. म्हणजे वारंवार टोल द्यायची गरज नाही. तोही फारसा जास्त नाही. याचा अर्थ या मार्गावरील प्रवास सुसह्य आहे, स्वस्त आहे, चांगला आहे आणि वेळेची बचत करणारा आहे. या महामार्गावर अपघात झाले म्हणजे मुद्दाम समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या बातम्या छापल्या जातात. अशामुळे अकारण धास्ती निर्माण होते. या सर्व कारणांचा शोध घेतला तर एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे या रस्त्यावरून जाताना जे नियम घालून दिलेले आहेत, त्याचे पालन आपण केले पाहिजे. या महामार्गावरून जाताना दोन गाड्यांमधील अंतर किमान २०० मीटर असावे, असाही एक नियम आहे. तो नियम सर्रास मोडण्यात येतो.
अपघाताच्या या बातम्या वाचून या महामार्गावरून जाणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांच्या समुपदेशनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जवळपास समुपदेशन केंद्रे उभारण्यात येणार आहेत, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. वाटेल त्या वेगाने बेफाम धावणे, भलत्याच लेनमध्ये आपली वाहने चालविणे आणि शिस्त न राखणे हे धार्मिक कार्य समजून आपण करत असतो. हे करताना आपण कसे कमीत कमी वेळात आलो याच्या फुशारक्या मारणारे अनेक लोक आम्हाला भेटले आहेत, आता याला काय म्हणावे? ज्याप्रमाणे या मार्गावर ठिकठिकाणी सूचना पट्टीका लावण्यात आलेल्या आहेत, त्याचे पालन केले नाही तर त्यासाठी समुपदेशन करण्यात येणार आहे.
या समुपदेशनाबरोबरच बेशिस्त वाहनचालकांसाठी दंडाची तरतूदही केली पाहिजे. कसेतरी झुगाड जमवून आपण किती बहादुरी करत आहोत. अशा गमजा मारून आपल्या हुशारीचे प्रदर्शन करणारे जे कोणी असतील त्यांना दंड झालाच पाहिजे. या महामार्गावर काही ठिकाणी रात्रीच्या वेळी जंगली ेशापदे येतात त्याचे कारण ज्या ज्या ठिकाणी वने आहेत त्या ठिकाणी कोणतेही ेशापद प्रवेश करणार नाही याचीही व्यवस्था करणे गरजेचे आहे. या महामार्गाच्या शिस्तपालनाची गरज अत्यंत महत्वाची आहे, हे आम्हाला वारंवार सांगावे लागत आहे. एखाद्या वाहनचालकाने बेदरकारपणे गाडी चालवली तर त्याची नोंद तत्काळ झाली पाहिजे. आणि त्यासाठी लागणारा दंड भरण्याची व्यवस्थाही झाली पाहिजे. राज्यात असे अनेक महामार्ग तयार होणार आहेत.
देशातही असे अनेक महामार्ग असतील. या महामार्गावरून जाताना वाहन जेव्हा त्या महामार्गावर प्रवेश करते तेथेच म्हणजे टोल गेटवर एक मिनिट थांबून वाहनचालकाला थोडक्यात नियमांचे पालन करण्याची सूचना दिली पाहिजे. आपण सध्या ज्या पद्धतीने गाड्या चालवतो त्यात प्रगत देशांच्या धर्तीवर तरतुदी झाल्या पाहिजेत. केवळ चांगले रस्ते बांधून भागावयाचे नाही. तर या चांगल्या रस्त्यांवर तेवढीच चांगली व्यवस्था करणेही गरजेचे आहे. समृद्धी महामार्गावर समुपदेशक आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पडतील अशी व्यवस्थाही झाली पाहिजे. एकूणच समृद्धी महामार्गाचा फायदा बहुसंख्याकांना होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या त्या गोष्टी करणे हे संबंधित यंत्रणांचे कामच आहे. आणि ते काम योग्य प्रकारे होते की नाही हे पाहणे तेवढेच गरजेचे आहे. ते केले तरच समृद्धीवरील अपघातांची समृद्धी आपोआप संपेल.