मानहानी प्रकरणात राहुल गांधींना २ वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली, दि.२३। वृत्तसंस्था कर्नाटक रॅलीत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की- सर्व चोरांचे आडनाव मोदी का? या विधानावरून त्यांच्याविरोधात सुरत न्यायालयात मानहानीचा खटला सुरू होता. आज सुरत जिल्हा न्यायालयाने मानहानी प्रकरणात त्यांना दोषी ठरवले आहे. त्यांना दोष वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. निवेदन देताना राहुल गांधी म्हणाले की- माझा हेतू चुकीचा नव्हता. माझे वक्तव्य फक्त दोन व्यक्तीबद्दल होते. कोणत्याही समाज किंवा व्यक्तीबद्दल नव्हते. असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. राहुल गांधी यांना आयपीसी कलम ५०० अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. यामध्ये २ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. राहुल यांच्या वकिलाने कोर्टाला सांगितले – या संपूर्ण घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. यामुळे कोणाचेही नुकसान झालेले नाही. म्हणूनच आम्ही कोणतीही दया मागणार नाही.

न्यायाधीशांनी राहुल यांना दोषी ठरवले आणि विचारले काही बोलायचे आहे का? त्यावर राहुल म्हणाले की, मी भ्रष्टाचाराविरोधात बोलतो. पण जाणीवपुर्वक काहीही बोललो नाही. राहुलच्या बोलण्याने कोणाचेही नुकसान झालेले नाही, त्यामुळे किमान शिक्षा झाली पाहिजे. दुसरीकडे फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी सांगितले की, राहुल गांधी हे खासदार आहेत. जे कायदा करतात, त्यांनी तो मोडला तर समाजात काय संदेश जाईल, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे.

गेल्या चार वर्षांपासून त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला सुरू होता. तत्पूर्वी, १७ मार्च रोजी या प्रकरणातील सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. निकालाच्या वेळी राहुल कोर्टात हजर होते. राहुल गांधी सकाळी दिल्लीहून सुरतला पोहोचले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी १५० जवान तैनात करण्यात आले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल यांनी आपल्या भाषणात चोरांचे आडनाव मोदी असल्याचे म्हटले होते. सर्व चोरांना मोदी हे आडनाव का असते, मग तो ललित मोदी असो की नीरव मोदी असो की नरेंद्र मोदी. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी तीन वेळा न्यायालयात हजर झाले. ऑक्टोबर २०२१ च्या शेवटच्या हजेरीदरम्यान, त्याने स्वतःला निर्दोष असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *