नवी दिल्ली, दि.९। वृत्तसंस्था अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराची नवी छायाचित्रे समोर आली आहेत. ही पहिल्या मजल्याची आहेत. तळमजल्यावरील छत तयार झाल्यानंतर पहिल्या मजल्यावर खांब उभारले जात आहेत. पहिल्या मजल्यावरच राम दरबार बांधला जाणार आहे. तळमजल्यावरील गर्भगृहात रामलला आपले चार भाऊ आणि हनुमानजींसोबत विराजमान होतील. मंदिराच्या बाहेर ८ एकर जागेवर उद्यान उभारले जात असून, त्याचा आकार ८०० बाय ८०० मीटर आहे.
गर्भगृहाबाहेर मंडपाचे नक्षीकाम केले जात आहे. राम मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा म्हणाले की, २०२४ मध्ये मकर संक्रांतीनंतर एका शुभ मुहूर्तावर प्राण प्रतिष्ठा होईल. पहिल्या चैत्र रामनवमीला सूर्याची किरणे परमेेशरांच्या कपाळावर पडतील. त्याची व्यवस्था केली जात आहे. तळमजल्यावर मजला, दिवे आणि काही कोरीव काम करणे बाकी आहे, असे मिश्रा म्हणाले. बहुतांश काम पूर्ण झाले आहे. देवांच्या मूर्तीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल. नगारा शैलीत राम मंदिर बांधले जात आहे. प्रभू राम ज्या ठिकाणी बसणार आहेत त्या ठिकाणी सर्वत्र अलौकिक कोरीव काम करण्यात आले आहे.