चेन्नई, दि.९। वृत्तसंस्था रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा रंग बदलला आहे. आतापासून निळ्याऐवजी भगवा रंग असेल. नवा रंग तिरंग्यापासून प्रेरित असल्याचे रेल्वेमंत्री अिेशनी वैष्णव यांनी म्हटले आहे. याशिवाय वंदे भारत ट्रेनमध्ये २५ किरकोळ बदलही सोयीसाठी करण्यात आले आहेत. यासाठी प्रवासी आणि तज्ज्ञांनी सूचना केल्या होत्या. सध्या देशभरात २५ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. २ गाड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. २८व्या ट्रेनला प्रायोगिक तत्त्वावर भगवा रंग देण्यात आला आहे. ही ट्रेन सध्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये ठेवण्यात आली आहे.
वंदे भारत एक्सप्रेसच्या सर्व गाड्या या कारखान्यात बनतात. अिेशनी वैष्णव यांनी शनिवारी कारखान्याची पाहणी केली. दक्षिण रेल्वेच्या सुरक्षा उपायांचाही त्यांनी आढावा घेतला. ही मेक इन इंडियाची संकल्पना असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. हे आपल्या देशातील अभियंते आणि तंत्रज्ञांनी डिझाइन केलेले आहे. फील्ड युनिट्सकडून मिळालेल्या फीडबॅकनुसार आम्ही वंदे भारत ट्रेनमध्ये बदल केले आहेत. अिेशनी वैष्णव यांनी शनिवारी ‘अँटी क्लाइंबिंग डिव्हाइस’ या नवीन सुरक्षा वैशिष्ट्याचीही पाहणी केली. त्यांनी सांगितले की, ही मानक वैशिष्ट्ये सर्व वंदे भारत आणि इतर ट्रेनमध्येही राहतील.