दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नऊ आमदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीपदाची शपथ घेते झाले. ही शपथ घेतल्यावर हे सर्व आमदार मंत्री झाले आहेत. पण १० दिवसांपर्यंत खातेवाटप झालेले नाही. त्यांचे खातेवाटप झालेले नाही. इकडे शिवसेनेच्या आमदारांचे मंत्रिपदाचे खातेवाटपही झालेले नाही. भाजपच्या आमदारांचे तर विचारूच नका. या दोघांच्या आमदारांपेक्षा जास्त आमदार असूनही दमदार असलेल्या भाजपला आणि भाजपच्या आमदारांना दम लागला आहे.
मंत्रिपद मिळेल म्हणून शिवसेनेचे आमदार नवे कपडे शिवून बसले होते. पण मध्येच राष्ट्रवादी आली आणि त्यामुळे वादावादी झाली असे म्हणतात. खातेवाटपापासून अनेक बाबतीत तिढा निर्माण झाला आहे. ३ पक्षांचे सरकार असल्यामुळे त्यातील २ पक्ष देशव्यापी नाहीत. ते महाराष्ट्रात आहेत. पण हा सर्व पेचप्रसंग स्थानिक पातळीवर सोडविता येत नाही म्हणून आता दिल्लीच्या दरबारात मांडण्यात येत आहे. असे ऐकण्यात येते की, मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या काही मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत आणि इतर आमदारांना मंत्री करावे याला मुख्यमंत्री तयार नाहीत. तिकडे राष्ट्रवादीलाही काही मंत्रीपदांची आशा आहे. पण मंत्रीपदे मर्यादित आहेत. डाळिंब एक आहे पण खाण्यासाठी शंभर आजारी आहेत.
या सर्वांचा आजार कसा दुरुस्त करावा यासाठी आता दिल्लीचे डॉक्टर औषध देणार आहेत. महाराष्ट्रातही दिल्लीचे डॉक्टर मात्रा देतात. यावर सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. वर्षभरापासून गतिमान असलेल्या सरकारची गती आणि प्रगती थांबल्यासारखी झाली आहे. येत्या ४-५ दिवसात विधिमंडळाचे अधिवेशन आहे. त्यामुळे आता आज – उद्या खातेवाटप होणे गरजेचे झाले आहे. पण तेवढीच महत्त्वाची बाब अशी की, गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रीपदाला इच्छुक आमदारांना कसे शांत करावे हा मुख्यमंत्र्यांसमोर यक्षप्रश्न आहे. दिल्लीेशर लवकरात लवकर महाराष्ट्राचा गाडा रुळावर आणतील अशी अपेक्षा आपण करू या!