पानिपत, दि.१८। वृत्तसंस्था राऊज अव्हेन्यू कोर्टाने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह आणि सचिव विनोद तोमर यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ६ प्रौढ कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या लैंगिक शोषणप्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. यापूर्वी न्यायालयाने ७ जुलै रोजी समन्स बजावून दोघांनाही १८ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. यावर बृजभूषण यांनी आपण नक्कीच न्यायालयात हजर राहणार असल्याचे सांगितले होते. त्यांना सुनावणीसाठी सूट घेण्याची आवश्यकता नाही, असे म्हटले होते.
यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी १ जुलै रोजी झाली होती. दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने लैंगिक छळ प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्याचा विचार करण्यासाठी ७ जुलैची तारीख निश्चित केली होती. १५ जून रोजी दिल्ली पोलिसांनी राऊज अव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र सादर केले होते. बृजभूषण यांच्याव्यतिरिक्त थऋख सहायक सचिव विनोद तोमर यांचेही नाव आरोपींमध्ये आहे. पैलवानांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेले जबाब हा आरोपपत्रात महत्त्वाचा आधार मानण्यात आला आहे.