नवी दिल्ली, दि.२०। वृत्तसंस्था संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. कामकाज सुरू होताच विरोधी खासदारांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्याचवेळी राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. तत्पूर्वी, मणिपूरमध्ये २ महिलांची रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत धिंड काढण्यात आल्याच्या घटनेवर पीएम मोदी म्हणाले, ‘आज माझे हृदय वेदनांनी भरले आहे, रागाने भरले आहे. मणिपूरची घटना ही कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. पाप करणारे कोण आहेत आणि किती आहेत हे बाजूला राहू द्या. ते म्हणाले, ‘हा अपमान संपूर्ण देशाचा आहे. १४० कोटी भारतीयांसाठी लाजिरवाणे आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यास सांगतो.
माता-भगिनींच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचला. पंतप्रधान म्हणाले की, या देशात, भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात किंवा कोणत्याही राज्य सरकारमध्ये, राजकीय वाद- विवादाच्या वर उठून कायदा आणि सुव्यवस्था आणि बहिणींचा सन्मान यांना प्राधान्य आहे. कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही. मणिपूरच्या मुलींचे जे झाले ते कधीही माफ केले जाऊ शकत नाही. वास्तविक, मणिपूरमध्ये कुकी समाजाच्या दोन महिलांना विवस्त्र करून जमावाने रस्त्यावर धिंड काढली होतरी. ही बाब ४ मेची आहे. राजधानी इंफाळपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात ही घटना घडली. त्याचा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. राज्यात अडीच महिन्यांहून अधिक काळ हिंसाचार सुरू आहे.