मुंबई , दि.२७। प्रतिनिधी बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा राज्यातील पाऊस लांबला. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने धडाक्यात आगमन केले. तेव्हापासून आतापर्यंत राज्यात एकूण सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्राप्त झाली आहे. १७८ तालुक्यात सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त, १३० तालुक्यात ७५ ते १०० टक्के आणि ५८ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. राज्यात १२० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या ८५ टक्के पेरणी झाली आहे. यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा येथे अधिक पेरणी झाली असून सांगली, ठाणे, पुणे, सोलापूर, गडचिरोली येथे कमी पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी सोयाबीनची १११ टक्के आणि कापसाची ९६ टक्के झाली आहे. जास्तीच्या पावसामुळे पेरणी वाया गेली किंवा दुबार पेरणीची वेळ आल्यास महाबीजने संपूर्ण नियोजन केले आहे अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यावेळी शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. १२०.६८ लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. मागील वर्षी खरीप हंगामात ९६.६२ लाख शेतकरी सहभागी झाले होते. मुंबईत बुधवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच बुधवारी संध्याकाळी मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. गेल्या २४ तासांत महानगरपालिकेच्या पर्जन्य मापक यंत्रावरील नोंदणीनुसार दक्षिण मुंबईत सर्वाधिक पाऊस पडला. कुलाबा, सीएसएमटी स्थानक परिसर आणि नरिमन पॉईंट येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली.मुंबईत हवामान विभागाची फक्त कुलाबा आणि सांताक्रूझ परिसरात हवामानदर्शक संयंत्रे आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत महानगरपालिकेने तब्बल ६० ठिकाणी अशी स्वयंचलित संयंत्रे उभारली आहेत. त्यामुळे या सर्व ठिकाणी किती पाऊस पडला याची विभागवार माहिती उपलब्ध होत असते.