हरियाणातील नूह येथे सोमवारी विेश हिंदू परिषद आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या वतीने काढण्यात आलेल्या ब्रजमंडल यात्रेदरम्यान गोंधळ झाला. दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर तीन डझनहून अधिक वाहने जाळण्यात आली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये अनेक लोक आणि पोलीस जखमी झाले. गोळी लागल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचीही बातमी आहे. तथापि, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. नूंह जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचा सामना करण्यासाठी इतर जिल्ह्यांमधून पोलिस दलाला पाचारण केले आहे, संपूर्ण जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्याबरोबरच २ ऑगस्टला दोन दिवस इंटरनेटही बंद ठेवण्यात आले होते. जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.ब्रजमंडल यात्रा नुह येथील नल्हाड शिवमंदिरापासून फिरोजपूर-झिरकाच्या दिशेने निघाली. यात्रा तिरंगा पार्कजवळ पोहोचताच तेथे आधीच लोकांचा जमाव जमला होता. ते समोरासमोर येताच दोन्ही बाजूंनी वाद झाला आणि काही वेळातच दगडफेक सुरू झाली.