मुंबई, दि.७। प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनाच्या पोर्शभूमीवर मुंबईत घातपाती कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज मुंबई पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून दिली. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये हा फोन आला. विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचा दावा या व्यक्तीने केला. या बातमीने अत्यंत खळबळ माजली असून, यामुळे मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी सांगितलं की, पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने धमकीचा फोन केला होता. “मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होणार आहेत. विलेपार्ले परिसरातून बोलत आहे,’ असं त्या व्यक्तीने म्हटलं. नंतर या व्यक्तीने फोन बंद केला आहे. याप्रकरणाचा तपास सुरु आहे. स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना या अज्ञाताच्या धमकीमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.