शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती गवई साहेबांच्या नेतृत्वात जो निकाल दिला त्या निकालाने गुजरातमधील ३ न्यायालयांचे निकाल मनोरंजक ठरले आणि त्यामुळे त्या निकालांचाच निकाल लागला. या विषयावर आम्ही लागोपाठ २ दिवस याच सदरात काही नोंदी आपल्यासमोर मांडू शकलो. आज सकाळी लोकसभा सुरू होण्याआधी राहुल गांधी यांची सदस्यता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बहाल करण्यात आली. ही सदस्यता बहाल करताना ज्या पातळीवर हे कार्य करावयाचे होते ते न करता मनातील खदखद व्यक्त करून मनात नसले तरी जनाच्या लाजेमुळे राहुल गांधी यांना पुन्हा खासदार बनवावे लागले. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसच्या मूर्खपणाचा उल्लेख करण्याची गरज नव्हती. संसदीय कार्यमंत्री जरी सत्तारूढ पक्षाचा असला तरी त्याला दोन्ही पक्षांत समतोल साधायचे कार्य करावयाचे असते. भरतोय जनता पक्षाचे संसदीय कार्यमंत्री प्रमोद महाजन सामंजस्याचे कार्य अत्यंत खुबीदारपणे करत होते, हे आम्ही स्वतः पाहिले आहे.
काँग्रेस पक्षाचे विद्याचरण शुक्ल हे असेच संसदीय कार्यमंत्री होते. पण या प्रल्हादाने थोडी शालीनता ठेवली असती तर ते उठून दिसले असते. या पदावरील मंत्र्याला अशी खदखद बोलून दाखवणे योग्य नसते. दुसरे दिल्लीचे एक गायक खासदार जे भोजपुरी भाषेतील बाजारू गाण्यांचे गायक आहेत त्यांनीसुद्धा शालीनता दाखवली नाही. हे आम्ही यासाठी नमूद करत आहोत की, सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष हे परस्परांचे शत्रू नाहीत हे यांना समजलेच नाही. विरोधी पक्ष हा जणू काही पाकिस्तानकडून आयात केलेला आहे अशा प्रकारे समजून त्यांच्यावर हल्ले होत गेले तर या देशातील परस्परांविषयी सौहार्दाची जी परंपरा होती ती कशी कायम राहील, हा मोठा यक्षप्रश्न आहे. परवा म्हणजे शुक्रवारी राहुल गांधी यांच्यावरील खटल्याचा निकाल घेऊन काँग्रेस पक्षाच्या लोकसभेतील नेत्याला लोकसभेचे अध्यक्ष बिर्लाजींनी साधे प्रेमाने सोमवारी काय तो निर्णय घेऊ, असे सांगितले असते तरी काँग्रेस पक्षाला गेले २-३ दिवस बोंबाबोंब करावी लागली नसती. आता जे झाले ते झाले निदान काँग्रेस पक्षाने तरी झाले गेले विसरून आपली पावले उचलली पाहिजेत.
राहुल गांधी यांचा प्रवेश झाल्यामुळे आता उद्या अविेशास प्रस्तावावर काँग्रेस पक्षाचे खासदार गोगोई यांच्याऐवजी राहुल गांधी हेच प्रस्ताव मांडू शकतात. अविेशास प्रस्ताव असल्यामुळे २ दिवस चर्चा झाल्यावर त्याचे उत्तर पंतप्रधान देतील आणि त्यानंतर त्या उत्तराचे पोस्टमार्टेम करण्याचे कार्य राहुल गांधी यांना करता येईल. म्हणजे आता लोकसभेच्या रणांगणात उद्यापासून जे शब्दबाण उच्चारले जातील त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वक्तृत्वशैलीत उत्तरे देतील. या अविेशास प्रस्तावाचे कारण मणिपूरची स्फोटक परिस्थिती आहे. राहुल गांधी यांची सदस्यता इतक्या तडकाफडकी बहाल करण्यामागे कोणती परिस्थिती आहे याचा विचार केल्यास एक गोष्ट दिसते ती राहुल गांधी यांना संसदेबाहेर ठेवणे हे अधिक स्फोटक होऊ शकते. हे बहुधा सत्तारूढ पक्षाच्या लक्षात आले असावे. यामुळेच कुठल्याही परिस्थितीत आजचा घेतलेला निर्णय लोकसभेच्या सचिवालयाला घ्यावाच लागला असता. सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचारासाठी याचिका दाखल केली असती तर तिथे पुन्हा नाचक्कीच झाली असती. त्यामुळे तो मार्ग स्वीकारणे शक्य नव्हते. एकूण आजच्या राहुल गांधी यांच्या लोकसभा प्रवेशामुळे अनेक गोष्टी साध्य करता येतील.
अविेशास प्रस्तावावर चर्चा झाल्यावर तो विरोधी पक्षाला जिंकता येणार नाही हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. पण त्यावर चर्चा होणे आणि त्याद्वारे जो ऊहापोह होणार आहे, त्याचा फायदा निश्चितच विरोधी पक्ष उचलणार आहे. इकडे या आठवड्याच्या शेवटी संसदेचे सत्र समाप्त होईल आणि पुढच्या आठवड्यात राहुल गांधी यांची दुसरी भारत जोडो यात्रा सुरू झाली तरी या यात्रेमुळे राहुल गांधी आणि विरोधी पक्षाची प्रतिमा उंचावू शकते. कोणत्याही परिस्थितीत केंद्रातील सत्तारूढ पक्षाला आगामी विधानसभेच्या निवडणुका जिंकणे आवश्यक आहे. आजच्या परिस्थितीत छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश त्याला अनुकूल नाही. राजस्थानात थोडाबहुत आधार वाटतो पण वसुंधरा यांनी कर्नाटकच्या येडीयुरप्पासारखा विचार केला तर परिस्थिती कठीण आहे. आताच्या परिस्थितीत राहुल गांधी यांचा चेहरा विरोधी पक्षासाठी ओशासक चेहरा दिसत आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष म्हणजे अमित शहा त्यांचा मुकाबला कशा पद्धतीने करतात हे पाहणे मनोरंजक ठरू शकते. निदान आज तरी राहुल गांधी यांच्या संसद प्रवेशाचे दिलखुलासपणे स्वागत करणे आपले कर्तव्य आहे!