आज राहुल गांधी यांनी लोकसभेत आपले बहुप्रतीक्षित भाषण केले. अविेशास प्रस्तावात विरोधी पक्षाला जिंकण्याची संधी नव्हतीच हे सर्वांना ठाऊक होते. पण पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत यावे आणि मणिपूरच्या बाबतीत बोलावे हाच काय तो या अविेशास प्रस्तावाचा हेतू होता. विरोधी पक्षाच्या इंडियाने लोकसभेत आणि लोकसभेबाहेर विनंती करून, घोषणा देऊन, आवाहन करून तसेच इतर अनेक शाब्दिक शस्त्रे वापरून मोदी यांना लोकसभेत बोलावण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश न आल्यामुळे अविेशासाचा प्रस्ताव मोठ्या विेशासाने सादर करण्यात आला. बदललेल्या परिस्थितीत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ५० खासदारांपेक्षा जास्त खासदारांचा पाठिंबा असल्यामुळे तो प्रस्ताव स्वीकारला. दरम्यानच्या काळात गेल्या शुक्रवारी राहुल गांधी यांच्यावरील लोकसभा सदस्यत्वाचे बहाल होणे हा शुभसंकेत होता. हे कार्य शुक्रवारी पार पडले. त्यानंतर ज्या क्रिया किंवा प्रतिक्रिया घडल्या त्याचे भांडवल सत्ताधारी पक्षानेही केले आणि विरोधकांच्या इंडियानेही केले. जराही अपेक्षा नसताना सोमवारी लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी यांची खासदारकी अगदी दुरांतोच्या गतीने त्यांना मिळाली. काल इंडियाने पुन्हा गुगली लगावली.
गोगोई यांच्याऐवजी राहुल गांधी हा अविेशास प्रस्ताव मांडतील, असे मुद्दाम व्हायरल करण्यात आले होते. पण काल दिवसभर राहुल गांधी यांनी लोकसभेत फक्त प्रेक्षकाचे काम केले. काल सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी परस्परांवर मोठ्या प्रमाणात दुगाण्या झाडल्या. यात आपल्या महाराष्ट्राचे खासदारही होते. एक सुप्रिया सुळे सोडल्यास बाकीचे खासदार निष्प्रभावी राहिले. श्रीकांत शिंदे काय किंवा नवनीत राणा काय त्यांच्यात दमच नव्हता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ज्या प्रकारचे वक्तव्य केले ते तर अत्यंत लाजीरवाणे होते. आज अखेर राहुल गांधी यांनी आपले तोंड उघडले आणि त्यांनी आपल्या भाषणात ज्या शब्दांच्या तोफा डागल्या त्यामुळे सत्ताधारी वर्ग हैराण झाला नसेल तरच नवल. त्यांनी जे आरोप केले ते आम्ही छापू शकत नाही. त्यांनी आपल्या भाषणात ज्या २ महिलांची हृदयद्रावक कहाणी सांगितली ती कोणत्याही सुजाण नागरिकांच्या डोळ्यात आसवे आणणारी होती.
मणिपूर आता मणिपूर राहिलेच नाही. त्याचे सरळसरळ दोन भागांत विभाजन झाले आहे, अशी वाक्ये फेकून राहुल गांधी यांनी मणिपूरच्या परिस्थितीवर जहाल टीका केली. भारताचे सैन्य एका दिवसात मणिपूरची परिस्थिती आटोक्यात आणू शकते, हे त्यांचे वाक्य ब्रह्मास्त्र ठरले यात वादच नाही. त्यांनी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आज त्यांनी अदानींबाबत चकार शब्दही उच्चारला नाही. पण भारताच्या संसदीय इतिहासातील जहाल भाषणांपैकी १ भाषण राहुल गांधी यांनी केले. सत्ताधारी पक्षाने अनेक अडथळे आणले. पण राहुल गांधी त्यांना पुरून उरले. आता उद्या या अविेशास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वक्तृत्वकलेचे कसब लावावे लागणार आहे. मोदीजी पट्टीचे वक्ते आहेत. कोणत्या विषयावर कुठे आणि कसे बोलावे, जनमानसावर आपली छाप कशी पाडावी यात त्यांचा हातखंडा आहे. आजच्या राहुल गांधी यांच्या घणाघाती भाषणावर मोदी यांचा उतारा किती परिणामकारक होतो हे आपण उद्या बघू या! तूर्त रात्रभर मोदी यांनी विचार करावा आणि आपल्या वाचकांनी त्याची प्रतीक्षा करावी एवढीच आमची विनंती आहे!