प्राध्यापक हरी नरके अकाली गेले!

प्राध्यापक हरी नरके यांचे निधन एका परिवर्तनशील विचारवंताचे निधन आहे. प्राध्यापक हरी नरके यांच्या बालपणाची एक आठवण आहे. त्यांना त्यांच्या आईच्या मानलेल्या बहिणीमुळे शाळेचे दर्शन झाले. त्या मानलेल्या बहिणीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिकण्याचा सल्ला हरी नरके यांच्या आईला दिला. आणि वारंवार मागे लागल्यामुळे अखेर प्राध्यापक नरके यांच्या मोठ्या भावाने जबरदस्तीने त्यांचे नाव शाळेत टाकले. अत्यंत हुशार असल्यामुळे आणि स्मरणशक्ती तीव्र असल्यामुळे ते उच्चविद्याविभूषित झाले आणि प्राध्यापकपदाला पोहोचले.

प्राध्यापक हरी नरके कृतिशील परिवर्तनवादी होते. १९८०च्या दशकात साप्ताहिक ‘सोबत ‘मध्ये बाळ गांगल यांनी महात्मा फुले यांची घोर बदनामी करणारा लेख लिहिला. त्या लेखाची चिरफाड करून नरके यांनी सबळ पुराव्याच्या आधाराने उत्तर दिले. त्या काळी त्यांचे वय फार मोठे नव्हते. पण त्यामुळे हरी नरके भविष्यात आपला विद्वत्तेचा प्रकाश दूरवर पसरवतील असा विेशास दिसून आला. प्राध्यापक नरके अतिशय व्यासंगी लेखक होते, संशोधक होते, प्राध्यापक होतेच होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते नामांकित वक्तेही होते. किंबहुना ते वक्ता दशसहस्रेशू होते. त्यांच्या व्यासंगामुळे आणि भाषणाच्या शैलीमुळे ऐकणाऱ्याच्या मनावर व्यापक परिणाम होत असे. महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या श्रद्धेचे विषय होते. त्यामुळे ‘महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा ‘ हे त्यांचे पुस्तक प्रचंड गाजले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून नेटाने प्रयत्न करणारे नरके आता दिसणार नाहीत.

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती – जमाती आणि अन्य मागासवर्गीय यांच्या बाबतीत मागास आयोगाचे सदस्य असताना त्यांनी ज्या शिफारशी केल्या त्या मूलभूत होत्या. प्राध्यापक नरके इतके व्यासंगी होते की, त्यांना चालताबोलता विेशकोश म्हटले जाई. त्यांनी कितीतरी संस्थांवर आणि समित्यांवर काम केले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्या भिडे वाड्यात पाहिली मुलींची शाळा सुरू केली, त्या भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले.

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी लढा देण्यात ते आघाडीवर होते. योगायोग असा की, आज नामविस्ताराच्या वर्धापनदिनी त्यांचे निधन झाले आहे. त्यांची व्याख्याने बुद्धिमत्तापूर्ण असत. पण त्यात बोजडपणा नव्हता. केवळ त्यांनी आपल्या व्याख्यानासाठी विेशसंचार केला. गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. त्यांच्यावर गुजरातमध्ये उपचार झाल्यावर ते स्वस्थ होऊन परत आले होते. पण त्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली आणि हा महाविद्वान काळाच्या पडद्याआड गेला. आजकाल ६० वर्षाचे वय म्हणजे तरुणपणातच गणले जाते. प्राध्यापक नरहर कुरुंदकर ५०व्या वर्षी गेले. इतर अनेक विद्वान असेच अल्पायुषी ठरले. त्यात आता प्राध्यापक हरी नरके यांचाही समावेश करण्यास हरकत नाही. पण आपल्या ६० वर्षे वयाच्या आयुष्यात त्यांचे शिक्षण झाल्यावर त्यांनी आपले आयुष्य आणि आपली विद्वत्ता परिवर्तनवादी चळवळीला वाहिली होती. त्यांच्या निधनामुळे मराठी भाषेचीही फार मोठी हानी झाली आहे.’ महासागर’ परिवारातर्फे आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *