नाशिक, दि.२३। प्रतिनिधी कांदा निर्यात शुल्काच्या निर्णयाविरोधात गेल्या चार दिवसांपासून नाशिक जिल्हयात ठप्प असलेले कांदा लिलाव गुरूवार (दि.२४) रोजी पूर्ववत होणार आहे. केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यापारी संघटनांनी हा निर्णय जाहिर केला. या निर्णयामुळे बाजारपेठा पूर्ववत होऊन चांगली आवक होण्याचा तसेच चांगल्या दराचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून कांदा प्रश्न चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळाले. नाशिकसह अनेक भागांत शेतकर्यांची रास्ता रोकोसह आंदोलने झाली. त्यानंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यांनतर देखील अनेक भागांत आंदोलने सुरूच आहेत. नाशिक जिल्ह्यात केंद्र सरकारच्या निर्यात शुल्क वाढीच्या धोरणामुळे चार दिवसांपासून लिलाव ठप्प आहेत.अशातच केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत या प्रश्नावर मध्यस्थी करत प्रश्न सोडविला आहे. त्यानुसार उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या खुल्या होणार असून कांदा लिलावाला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.