बंगळुरू, दि.२३। वृत्तसंस्था चांद्रयान ३ ने बुधवारी संध्याकाळी ६:०४ वाजता चंद्रावर यशस्वी लँडिंग केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील जोहान्सबर्गमधून लाइव्ह स्ट्रिमिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले. तेथून त्यांनी देशाला संबोधित केले. पीएम मोदी म्हणाले-अशा ऐतिहासिक घटना देशाच्या जीवनाचे चैतन्य बनतात. हा क्षण अविस्मरणीय आहे. हा क्षण अभूतपूर्व आहे. विकसित भारताच्या शंखनादाचा हा क्षण आहे. नव्या भारताचा जयघोष करण्याचा हा क्षण आहे. पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक देशवासियांप्रमाणे माझेही लक्ष चांद्रयान महाअभियानावर आहे. मी माझ्या देशबांधवांशी आणि माझ्या कुटुंबियांशीही या उत्साह आणि आनंदात सहभागी आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचला आहे, जिथे आजपर्यंत कोणताही देश पोहोचला नाही. आजपासून चंद्राशी संबंधित अनेक समज बदलतील.