२०२१ साली काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात आलेले ग्वाल्हेरचे महाराजा ज्योतिरादित्य सिंधिया यांची अवस्था आता भलतीच बिकट झालेली आहे. ‘ न खुदाही मिला, न विसाल – ए – सनम, न इधर के हुए न उधर के हुए’ अशी काहीशी अवस्था या महाराजांची झाली आहे. मोठ्या तावातावात डोळे वटारून राहुल गांधी यांना संसदेत आपली स्वामिनिष्ठा प्रकट करण्यासाठी या महाराजांनी विषवमन केले होते. आपल्या १५-२० आमदारांच्या बळावर त्यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रिपद हवे होते. पण काँग्रेस श्रेष्ठींनी आणि जनतेने कमलनाथ यांच्या पारड्यात वजन टाकले. यामुळे काटावरचे बहुमत असलेल्या काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. काँग्रेस पक्षाने या दिवट्या महाराजांना काय दिले नाही? २ वेळा केंद्रात कॅबिनेट पद, प्रियंका गांधी यांच्याबरोबर अर्ध्या उत्तर प्रदेशचा ताबा, त्यांनी लिहून पाठवलेल्या जवळजवळ अर्ध्यांना तिकिटे आणि मानाचे स्थान एवढे सगळे दिल्यावरही है महाराज समाधानी नव्हते.
महाराज सरकार पाडू शकतात हे उघड दिसत होते. पण तरीही काँग्रेस पक्षाने त्यांची मनधरणी केली नाही आणि काँग्रेसचे सरकार पडले. आता आज काय परिस्थिती आहे याचा विचार केला तर काँगेस पक्षातील हे महाराज भारतीय जनता पक्षात आल्यावर महाराज राहिलेले नाहीत. आता ते ऑर्डीनरी भाईसाहेब झालेले आहेत. काँग्रेस पक्षातील वरील पातळीपासून अगदी खालच्या थरापर्यंत राजासाहेबांना जो मुजरा करण्यात येत होता तो आता इकडे आल्यावर बंद झाला आहे. हे फारसे काम नसलेले मंत्रालय घेऊन हे काँग्रेसमधील महाराज भारतीय जनता पक्षात गद्दार म्हणून ओळखले जात आहेत. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये काही उमेदवारांची घोषणा केली होती. त्यात सिंधियांच्या संरक्षणातील जागांवर दुसऱ्याचे नाव घोषित झाल्यामुळे अनेक सिंधिया समर्थक घनघोर नाराज झाले आहेत. भविष्यकाळात जेव्हा जेव्हा उमेदवारांच्या नावांची घोषणा होईल तेव्हा तेव्हा सिंधियांचे निष्ठावंत आणि भाजपचे निष्ठावंत यांची तुलना होईल.
त्यावेळी किती सिंधियावादींचा पत्ता कटेल याचा पत्ता खुद्द ज्योतिरादित्य भाईसाहेबांनाही माहीत नसेल. भारतीय जनता पक्षात ज्यांनी उभी हयात घालवली आहे, ज्यांची निष्ठा वादातीत आहे, ज्यांनी पक्षाची सेवा तन – मन – धनाने केली आहे, असे उमेदवार डावलणे भाजपलाही शक्य होणार नाही. गद्दारांना गादी आणि निष्ठावंतांकडे सतरंजी उचलण्याचे काम असे होऊ शकणार नाही. त्यामुळे भाईसाहेबांचे आणखी किती समर्थक त्यांच्यापासून काडीमोड घेतात हे आता बघावे लागेल. सिंधिया राजघराणे आणि त्यांचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांविरुद्ध केलेल्या संघर्षात या राजघराण्याच्या ज्योतिरादित्य सिंधियांच्या पूर्वजांनी इंग्रजांस साथ दिली होती. सिंधीयांच्या पूर्वजांचे नाव त्यांच्या महालात सर्वांना ठाऊक असेल. पण बलिदान दिलेल्या राणी लक्ष्मीबाईंच्या नावाचे पोवाडे संपूर्ण भारतात गायले जात आहेत. इतकी वर्षे झाली तरी ‘खूब लडी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी ‘ असा त्यांच्या नावाचा जयघोष देशाच्या कानाकोपऱ्यात केला जातो.
आज राणी लक्ष्मीबाई यांचे, त्यांच्या कुटुंबाचे कोणीही कुठेही उच्चपदावर नाही. पण त्यांच्याबद्दलचा आदर भारतीयांच्या मनामनात वसलेला आहे. म्हणून ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जे केले ते त्यांच्या मनाला पटेल असेच केले. भारतीय जनता पक्षाने त्यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनण्याचे वचन दिले होते, असे म्हणतात. पण राजघराण्यातील ही वचने पाळली पाहिजेतच असे नाही. आपल्या नारायण राणे यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपद देण्याचे आमिष दाखवले होते. ते पूर्ण झाले नाही, हे आपल्याला ठाऊक आहे. आता ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांचे समर्थक गर्तेत सापडलेले दिसतात. ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी त्यांची अवस्था आहे. ग्वाल्हेरच्या या वनराजाची झालेली दीनवाणी अवस्था पाहून आमचे डोळे भरून आलेले आहेत. ईेशर त्यांना ही अवस्था भोगण्यासाठी बळ देवो, अशी आमची प्रार्थना आहे.