बंगळुरू, दि.२३। वृत्तसंस्था चांद्रयान-३ च्या लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवून इतिहास रचला आहे. याने चंद्राच्या अंतिम कक्षेपासून २५ किमीचा प्रवास ३० मिनिटांत पूर्ण केला. लँडर हळूहळू खाली उतरवण्यात आले. ५ वाजून ३० मिनिटांनी सुरुवातीला रफ लँडिंग खूप चांगली झाली. यानंतर लँडरने ५ वाजून ४० मिनीटांनी लॅण्डरने व्हर्टिकल लँडिंग केले. तेव्हा त्याचे चंद्रापासूनचे अंतर ३ किमी होते. अखेर लँडरने सहा वाजून चार मिनिटांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. अशा प्रकारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला.
चंद्राच्या कोणत्याही भागात वाहन उतरवणारा हा चौथा देश ठरला आहे. यापूर्वी केवळ अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीनने हे यश मिळवले आहे. आता सर्वजण विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर येण्याची वाट पाहत आहेत. धूळ स्थिरावल्यानंतर ते बाहेर येईल. विक्रम आणि प्रज्ञान एकमेकांचे फोटो काढून पृथ्वीवर पाठवतील. हा विक्रम रशियाच्या नावावर झाला असता, भारतापूर्वी रशिया चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर र्ङीपर-२५ यान उतरवणार होता. हे लँडिंग २१ ऑगस्ट रोजी होणार होते, परंतु शेवटची कक्षा बदलताना ते मार्गापासून दूर गेले आणि चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले. चांद्रयान-३ आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून १४ जुलै रोजी ३.३५ वाजता प्रक्षेपित करण्यात आले होते. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी ४१ दिवस लागले. पृथ्वीपासून चंद्राचे एकूण अंतर ३ लाख ८४ हजार किलोमीटर आहे.