भारताच्या शास्त्रज्ञांनी काल सायंकाळी चांद्रयान – ३ अलगद चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविले. १९६९ साली पहिली चंद्रमोहीम झाली होती. पण भारताने त्यानंतर आपले चांद्रयान – १ चे मिशन राकेश शर्मा यांना चंद्रावर पाठवून पूर्ण केले. काही दिवसांपूर्वी बलाढ्य रशियाला जे साध्य करता आले नाही ते भारताने साध्य केले. या अभियानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे आपण आपले हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविले. हा चंद्राशी दोस्ती करण्याचा प्रसंग केवळ भारतानेच नव्हे, तर जगाने अनुभवला. ताशी ६ हजार कि. मी. पेक्षा अधिक वेगाच्या चांद्रयानाला ताशी १० कि. मी. च्या वेगाने उतरविणे, ही सामान्य गोष्ट नव्हती. भारताच्या या मोहिमेचा एकूण खर्च फक्त ६१५ कोटी होता. इतर प्रगत देशांच्या बजेटपेक्षा ही रक्कम कितीतरी कमी आहे. आता सुरक्षित लँडिंग करणारे चांद्रयान – ३ चंद्रावरील वातावरण, धूळ याचा अभ्यास करणार आहे. आपले यान ४० दिवसांपर्यंत योग्यरीत्या काम करू शकेल, ही बाबही तेवढीच महत्त्वाची आहे.
आपल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांनी पूर्ण अभ्यास करून चंद्रावरील खड्डे, त्याचे तापमान, तेथील दिवस – रात्रीचा अंधार – प्रकाश याचाही अभ्यास करणार आहे. चंद्रावरील दिवस आपल्या १४ दिवसांएवढा असतो.आणि रात्रही १४ दिवसांएवढी असते. आपल्या शास्त्रज्ञांनी सर्व बाबींचा व्यवस्थित अभ्यास करून त्याचा उपयोग केलेला दिसतो. हे यश अभूतपूर्व आहे. या यशाला केवळ या यशाचीच उपमा देता येईल. ‘या सम हा’ अशीच ही चंद्रमोहीम आहे. यात शंका नाही. हा क्षण संपूर्ण देशवासीयांसाठी गौरवाचा आहे.
या यशामुळे इंग्लंडच्या काही दीडशहाण्या पत्रकारांनी भारताला काही रकमेची मागणी केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इंग्रजांनी ज्याप्रमाणे आपल्या देशाला लुटले, त्याची भरपाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. काही दिवस चंद्रविजयाची ही ‘उत्तरक्रिया’ अशीच चालणार आहे. जगातील अंतराळाचा अभ्यास करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांना भारताच्या या विजयामुळे भारतीय शास्त्रज्ञांच्या बुद्धिमत्तेची झलक मिळाली. आम्ही आमच्या शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.