‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’योजनेच्या (Ladki Bahin Yojana) माध्यमातून राज्यातील 1 कोटी 90 लाख बहीणींच्या बॅंक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित 60 लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल. एकाही भगिनीला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. शिर्डी येथे आयोजित मुख्यमंत्री-महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला महामेळाव्याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
राज्यातील 1 कोटी महिलांना लखपती दिदी करण्यात येणार
फडणवीस म्हणाले की, महिला विकासाच्या योजना केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही. त्यादृष्टीने केंद्र शासनाने लाडली बहीण, लखपती दीदी योजना आणली. राज्यातील 1 कोटी महिलांना लखपती दिदी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात लेक लाडकी योजना आणण्यात आली. यात मुलींना वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर एक लाख रूपये मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
महिलांना एसटी बसमध्ये 50 टक्के तिकिट सवलत
महिलांना एसटी बसमध्ये 50 टक्के तिकिट सवलत देण्यात आली आहे. यामुळं तोट्यात आलेली एसटी फायद्यात आली. शासन महिला सक्षमीकरणासाठी संवेदनशीलपणे काम करित आहे. मुलींच्या शिक्षणासाठी 506 महत्त्वाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आता संपूर्ण शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यामुळं आता मुलींना शिकवले पाहिजे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या लाडक्या बहीणींना योजनेतून मिळालेली रक्कम मोलाची आहे. यापुढे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील. या योजनेच्या मासिक लाभात ही वेळोवेळी वाढ करण्यात येईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भगिनींना आश्वस्त केले.
शेतकऱ्यांना वर्षभर वीज देण्यासाठी शासनाचे काम सुरु
राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवित असल्याचे नमूद करून ते म्हणाले, शेतकऱ्यांना वर्षभर वीज देण्यासाठी शासन काम करीत आहे. शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा योजनेच्या माध्यमातून 8 हजार कोटींचा विमा देण्यात आला आहे. शेतमालाला हमीभाव देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. पन्नास वर्षापासून प्रलंबित निळवंडे प्रकल्पास शासनाने चालना दिली आहे. पश्चिम वाहिनींचे 55 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणून अहमदनगर, नाशिकसह संपूर्ण मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे काम शासन करणार आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी सांगितले. शिर्डी संस्थानामधीन 584 कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले आहे. तसेच शिर्डी नवीन विमानतळांचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला महसूल, पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालीनीताई विखे पाटील, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, श्री.साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते.