‘शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात’, तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!

भंडारा : जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघातील (Tumsar Assembly Constituency) एक मोठा राजकीय चेहरा म्हणून माजी आमदार चरण वाघमारे (Charan Waghmare) यांच्याकडं बघितलं जातं. भंडाऱ्यात आमदार परिणय फुके (Parinay Phuke) यांची एन्ट्री झाल्यानंतर चरण वाघमारे आणि परिणय फुके यांचं कधी जमलं नाही. त्यानंतर पक्ष विरोधी कारवाई केल्याचा वाघमारे यांच्यावर ठपका ठेवत भाजपनं (BJP) त्यांना पक्षातून काढलं. त्यानंतर आता त्यांची आगामी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) लढण्याची तयारी सुरू झालेली आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दोन वेगवेगळे गट स्थापन झाल्यानंतर ही निवडणूक चुरशीची होणार आहे. राज्यातील गाजा वाटपाचा फॉर्म्युला तयार असला तरी, कुठल्याही पक्षाचा त्यावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. अशात भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघावर सध्या अजित पवार गटाचे आमदार असतानाही भाजपनं यावर दावा केलेला आहे. तर, शरद पवार गटानं देखील तुमसरची जागा मिळावी यासाठी आग्रह धरला आहे. तर, दुसरीकडं काँग्रसनंही या जागेवरील दावा सोडलेला नाही.

…तोपर्यंत भाजपमध्ये जाणार नाही

त्यातच कार्यकर्त्यांच्या भरोशावर या मतदारसंघावर सुरुवातीपासून चरण वाघमारे यांनी पकड ठेवलेली असून त्यांनी विधानसभा लढण्याची तयारी सुरू केलेली आहे. चरण वाघमारे हे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. भाजपमधून काढल्यानंतर ते आता जोपर्यंत परिणय फुके भाजपात आहे. तोपर्यंत भाजपमध्ये जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

चरण वाघमारे तुतारी हाती घेणार? 

आज तुमसर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा येत आहे. या यात्रेच्या निमित्ताने राजू कारेमोरे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता चरण वाघमारे कुठल्या पक्षाकडून लढतात? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असल्या तरी आगामी काळात ते तुतारी हातात घेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारासमोर मोठं आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणूक मी नक्की लढणार : चरण वाघमारे 

याबाबत चरण वाघमारे म्हणाले की, लोकसभेत काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांना पाठिंबा देताना जाहीर केलं होतं की, विधानसभा निवडणूक मी नक्की लढणार आणि ती लोकवर्गणीतून लढवणार आहे. मी कुठल्याही पक्षाकडं उमेदवारी मागितलेली नसली तरी शरद पवार पक्षाचे नेते माझ्या संपर्कात आहेत. शरद पवार पक्षाकडून उमेदवारी घेण्याबाबत माझा अजून अंतिम निर्णय झालेला नाही. जोपर्यंत परिणय फुके हे भंडारागोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात भाजपत आहेत तोपर्यंत मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही. 2 तारखेपर्यंत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात माझे दौरे आहेत. त्यानंतर पक्षाची उमेदवारी घ्यायची की अपक्ष लढायचे, याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आता चरण वाघमारे नेमके कोणत्या पक्षातून विधानसभेची निवडणूक लढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *