अकोट अकोला जिल्हा

“तहानलेल्या मुक्या जीवांची आर्त हाक!”

उन्हाळ्यापूर्वी पाणवठे उभारण्याची भूमी फाउंडेशन अध्यक्षा कु.चंचल पितांबरवाले यांची जोरदार मागणी..

प्रशासनाने तात्काळ कृती आराखडा जाहीर करावा

अकोट | प्रतिनिधी:उन्हाळ्याची चाहूल लागताच अकोट शहरात तापमानाचा पारा झपाट्याने वाढू लागला असून मुक्या जीवांसाठी पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विदर्भातील उष्णतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अकोट तालुक्यात दरवर्षी प्रखर उन्हामुळे मोकाट जनावरे, गाई-गुरे तसेच विविध पक्षी व प्राणी यांना पाण्याअभावी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या कु. चंचल पितांबवाले यांनी नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मुख्याधिकारी तसेच पाणीपुरवठा सभापती श्री. अमोल पालेकर यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,अकोट शहरात उन्हाळ्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढते. त्याचा सर्वाधिक फटका हा मुक्या जीवांना बसतो.

शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ परिसर, मोकळी मैदाने तसेच प्रत्येक प्रभागात जनावरांसाठी पाणवठे, पाण्याच्या टाक्या व कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की,नगरपरिषदे मधील सर्व नव-नियुक्त सदस्यांनी आपल्या-आपल्या वॉर्डमध्ये किमान एक तरी पाणवठा उभारून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी. या उपक्रमातून लोकप्रतिनिधींची समाजोपयोगी भूमिका जनतेसमोर प्रत्यक्ष दिसून येईल आणि मुक्या जीवांना मोठा दिलासा मिळेल. सध्या शहरातील अनेक भागांत मोकाट जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काही नागरिक स्वतःहून घरासमोर पाण्याची भांडी ठेवत असले तरी ती अपुरी पडत आहेत. दरवर्षी तापमानाचा पारा चाळिशी पार करत असताना पाणवठ्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे प्रशासनाने केवळ आश्वासनांपुरते न राहता ठोस कृती आराखडा तयार करून तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मानवतेच्या आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करत उन्हाळ्यापूर्वीच नियोजनबद्ध उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. “मुक्या जीवांची तहान भागविणे हीच खरी मानवसेवा” असा संदेश देत शहरातील विविध सामाजिक संघटनांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, अकोट नगरपालिकेने या निवेदनाची सकारात्मक दखल घेऊन तातडीने पाण्याची उपलब्धता सुनिश्चित केल्यास उन्हाळ्यात होणारी जीवितहानी टाळता येऊ शकते. यावेळी अमित गावत्रे, विवेक फरदळे सह अनेक पशुप्रेमी उपस्थित होते.आता प्रशासन कितपत वेगाने आणि प्रभावी पावले उचलते, याकडे संपूर्ण अकोटकरांचे लक्ष लागले आहे. उन्हाळ्याचा कडाका वाढण्यापूर्वीच जर ठोस उपाययोजना करण्यात आल्या, तर हजारो मुक्या जीवांचे प्राण वाचू शकतील हीच शहरवासीयांची अपेक्षा आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *