मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर

नंदुरबार : राज्यात मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) आंदोलन सुरु असताना धनगर आरक्षणावरून (Dhangar Reservation) आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा शब्द दिला आहे. यानंतर भाजप नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी (padmakar valvi) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.

पद्माकर वळवी यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकार जितके आहेत तेवढेच त्यांनी वापरावेत. शिंदे समिती ही घटनाबाह्य तयार केलेली समिती आहे. शिंदे समितीला घटनात्मक कुठलाही अधिकार नाही. धनगर समाजाला शॉर्टकट आरक्षण देण्याच्या प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन

सुप्रीम कोर्टाने दिलेला निकालानंतर देखील मुख्यमंत्री धनगर समाजाला जीआर कसा देऊ शकतात? जीआर देणे ही अतिशय गंभीर बाब आहे. येणाऱ्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन दिले जात आहे. आदिवासी आमदार, खासदारांनी राजीनामा देण्याची गरज नाही. सरकारमध्ये राहून सरकारसोबत भांडण केले पाहिजे, असेही पद्माकर वळवी यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांचे शिक्षण किती आहे?

लोकांनी तुम्हाला प्रश्न मांडण्यासाठी पाठवले आहे. राजीनामा देण्यासाठी नाही. तुम्ही आवाज उठवला नाही तर मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवतील, असा इशारा त्यांनी आमदार आणि खासदारांना दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिक्षण किती आहे? असा सवालदेखील पद्माकर वळवी यांनी उपस्थित केला आहे.

याआधीही मुख्यमंत्र्यांवर टीका 

दरम्यान, पद्माकर वळवी यांनी काही दिवसांपूर्वी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचावर टीका केली. यावेळी बोलताना त्यांचा तोल सुटल्याचे दिसून आले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख केला होता. शिंदे हे बेरड, मूर्ख आणि नालायक मुख्यमंत्री असल्याचे पद्माकर वळवी यांनी म्हटले होते.

लोकसभेच्या तोंडावर पद्माकर वळवींनी केला होता भाजपमध्ये प्रवेश

पद्माकर वळवी 1999 ते 2014 या कालावधीत काँग्रेससकडून तळोदा आणि शहादा मंतदारसंघातून निवडून आले आहेत. 2009 ते 2014 या काळात त्यांना राज्यमंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. त्यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे क्रीडामंत्री म्हणून काम पाहिले आहे. पद्माकर दळवी यांनी 2024 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर प्रभावित होऊन भाजपमध्ये आल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *