अवघ्या 20 लाखांत ठाण्यात स्वप्नातलं घर! म्हाडाकडून तब्बल 8000 घरांसाठी सोडत, जाणून घ्या लॉटरी नेमकी कधी निघणार?

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून राबवल्या जाणाऱ्या एकूण 2030 घरांच्या सोडतीची चांगलीच चर्चा रंगली आहे. पुढच्या काही दिवसांत या सोडत प्रक्रियेत कोणाला घरे मिळाली आणि कोणाला नाही, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मुंबई मंडळाकडून ही सोडत प्रक्रिया राबवली जात असताना म्हाडाने ठाण्यात तब्बल 8 हजार घरांसाठी लॉटरी आणली आहेत. ऑक्टोबर महिन्यात या सोडत प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे या सोडत प्रक्रियेच्या माध्यमातून अवघ्या 20 लाखांत घर उपलब्ध होणार आहे.

एकूण 8000 घरांसाठी लॉटरी निघणार

मुंबई आणि उपनगरांत राहणारा प्रत्येकजण आपल्या हक्काच्या घरात जाण्याचं स्वप्न पाहात असतो. माझेही स्वत:चे घर होईल, अशी आशा प्रत्येकजण बाळगून असतो. म्हाडामुळे आता स्वत:च्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण म्हाडाच्या कोकण मंडळाकडून एकूण 8000 घरांची लॉटरी काढली जाणार आहे. ही लॉटरी ऑक्टोबर महिन्यात येणार आहे.

जाहिरात नेमकी कधी निघणार?

मिळालेल्या माहितीनुसार येत्या 3 ऑक्टोबरला यातील ठाण्यातील 913 घरांसाठी लॉटरी काढली जाईल. या घरांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य हे सूत्र राबवले जाईल. तर उर्वरीत 7000 घरांसाठी येत्या 8 ऑक्टोबर रोजी लॉटरी काढली जाईल. या घरांमध्ये वसई, टिटवाळा, ठाणे येतील म्हाडाच्या घरांचा समावेश असेल. विशेष म्हणजे ही घरे अवघ्या 20 लाख रुपयांत मिळणार आहेत.

सिडकोदेखील जाहिरात काढणार

दुसरीकडे सिडकोतर्फेदेखील घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहेत. सिडकोकडून सिडकोने वाशी, सानपाडा, जुईनगर, खांनेदेश्वर , नेरूळ या मोक्याच्या ठिकाणी घरे बांधली जात आहेत. या भागात एकूण 67 हजार घरांचे काम सुरू आहे. यातील 40 हजार घरांचे काम पूर्ण झाले आहे. सिडकोच्या घरांच्या लॉटरीचीही दसऱ्याच्या मुहूर्तावर जाहिरात निघण्याची शक्यता आहे.

मुंबई मंडळाचा निकाल 8 ऑक्टोबरला

दरम्यान मुंबई मंडळाकडून एकूण 2030 घरांसाठी लॉटरी प्रक्रिया राबवण्यात आली. या लॉटरीचा निकाल येत्या 8 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी कोणाला घर मिळाले आणि कोणाला मिळाले नाही? हे स्पष्ट होईल. या सोडत प्रक्रियेदरम्यान म्हाडाच्या घरांची किंमत फारच जास्त आहे, अशी तक्रार नागरिकांकडून केली जात होती. त्यानंतर म्हाडाने 2030 पैकी एकूण 370 वेगवेगळ्या ठिकाणच्या घरांची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *