शुभांगी पाटील यांचा विजय निश्चित; नाशिक पदवीधरच्या मैदानात छगन भुजबळांची एंट्री

राज्यात ताकद महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) असून नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency) महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडणूक आणण्यासाठी एकजुटीने काम करावे, असे प्रतिपादन  छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे. तसेच, नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक (Nashik) पदवीधर निवडणूक मतदानाची तारीख जवळ येत असून नाशिकमध्ये हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्या जोरदार प्रचारात धडाका सुरू असून आता महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाचे नेते उपस्थित होते. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी या बैठकीला दांडी मारल्याचे दिसून आले.

नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक राष्ट्रवादी भवन नाशिक येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांची जाण शुभांगी पाटील यांना आहे. पदवीधर मतदासंघात पहिल्या महिला उमेदवार म्हणून त्यांचा विजय पक्का असून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी पुन्हा आपल्याला एकत्र यायचे आहे. तोपर्यंत सर्वांनी परिश्रम घेऊन निवडणुकीला सामोरे जायचे आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून पूर्ण ताकदीने उभी राहील अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

ते म्हणाले की, पदवीधर निवडणूक ही आगामी निवडणुकांमधील महाविकास आघाडीचा पाया असून सर्व पदवीधर मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी देखील महाविकास आघाडीच्या सर्व घटकांनी तयारीला लागावे. आपली एकजूट टिकवून ठेवत आघाडी अधिक मजबूत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. उमेदवारी मिळून देखील अर्ज न भरणे ही पक्ष विरोधी घेतलेली भूमिका अतिशय चुकीची आहे. त्यामुळे जनमानसात असलेल्या प्रतिमेला तडा गेला आहे. त्यामुळे मतदारांनी किती विश्वास ठेवावा, असा सवालही त्यांनी विरोधकांना यावेळी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *