प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी अशी वक्तव्य करणं आम्हाला मान्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे भाजपचे आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. यावर संजय राऊतांनी आज सकाळी मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.
शरद पवारांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला
प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेसी चार दिवसापूर्वीच युती झाली आहे. सध्या शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी अशीच चर्चा झाली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे एक मोठे नेते आहेत. जर शरद पवार भाजपचे असते तर महाराष्ट्रात त्यांनी अडीच वर्षापूर्वी भाजपचे सरकार दूर ठेऊन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकरार येऊ दिलं नसते, असेही राऊत म्हणाले. शरद पवारांनी प्रत्येक ठिकाणी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. आजसुद्धा देशामध्ये विरोधी पक्षांच्या एकीचा आपण विचार करतो, तेव्हा आपण शरद पवार यांचे नाव घेतो. कारण सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे काम शरद पवार करु शकतील, असं संजय राऊत म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरायला हवेत
प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेताना जपून शब्द वापरायला हवेत, असे संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीसोबत एकत्र काम करायचे आहे. त्यामुळं भूतकाळातील मतभेद आपल्याला दूर ठेवायला हवेत आणि भक्कम आघाडी उभा राहायला हवी, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
त्याबाबत राहुल गांधी यांच्याशी बोलू
प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाची युती झालेली आहे. त्याचा महाविकास आघाडीशी संबंध नसल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं होतं. यावर देखील प्रसारमाध्यमांनी संजय राऊत यांना विचारले. यावेळी राऊत म्हणाले की, याबाबत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याशी बोलू. माझी राहुल गांधी यांच्याशी त्या विषयावर चर्चा झाली असल्याचे देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.