दक्षिण अफ्रिका पुढील दशकभरात 100 आफ्रिकन चित्ते भारतात पाठवणार, पर्यावरण मंत्रालयाची माहिती

दक्षिण आशियाई देशात चित्ता पुन्हा आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून दक्षिण आफ्रिकेनं भारताला 100 हून अधिक चित्ते (Project Cheetah) देण्याचा करार केला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नामिबियातून (Namibia News) आठ चित्त्यांच्या आगमनानंतर 12 चित्त्यांची सुरुवातीची तुकडी पुढील महिन्यात भारतात पाठवली जाणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरापासून चित्यांना भारतात आणण्यासाठीचा करार करण्यास सुरुवात झाली होती.

पर्यावरण मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलंय की, “चित्त्यांची सुरक्षित लोकसंख्या स्थापन करण्यात मदत करण्यासाठी पुढील आठ ते 10 वर्षांत दरवर्षी 12 चित्ते भारतात आणण्याची योजना आहे.” भारत एकेकाळी आशियाई चित्यांचं घर होता. परंतु, देशात 1952 पर्यंत हा प्राणी नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. भारतातील चित्ता नामशेष होण्याचं मुख्य कारण म्हणजे, त्यांच्या कातडीची तस्करी करण्यासाठी करण्यात आलेली शिकार.

2020 मध्ये चित्ता परदेशातून आणण्यासाठी संमती

2020 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर आफ्रिकन चित्ता देशामध्ये काळजीपूर्वक निवडलेल्या ठिकाणी आणला जाऊ शकतो, असा निर्णय भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं दिला. तेव्हा चित्त्यांना पुन्हा भारतात आणण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली. दक्षिण आफ्रिकेसोबत करारासाठी बराच काळ चर्चा सुरू होती. सुरुवातीला पहिला चित्ता गेल्या वर्षीच ऑगस्टमध्ये भारतात येण्याची अपेक्षा होती. पण, या प्रक्रियेला काहीसा उशिर झाला. दरम्यान, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आठ चित्त्यांची पहिली तुकडी भारतात दाखल झाली. त्यानंतर त्यांना काही काळ क्वॉरंटाईन करण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *