एखाद्या व्यक्तीने केलेल्या दुखापतीमुळे पीडित व्यक्तीचा दीर्घ कालावधीनंतर मृत्यू झाल्यास खून प्रकरणातील आरोपीची जबाबदारी कमी होत नाही, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने नोंदवलं. छत्तीसगड उच्च न्यायालयाने अपीलकर्त्यांना एका प्रकरणात हत्येच्या आरोपात दोषी ठरवलं होतं. त्यानंतर अपीलकर्त्यांनी या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. दोषींच्या या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
सुनावणीदरम्यान, अपीलकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं की, हल्ल्याच्या 20 दिवसांनंतर पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यावरुन असं दिसून येतं की हल्ल्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला नाही.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2012 मध्ये वादग्रस्त जमीन जेसीबीने सपाट करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपींनी पीडित व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला. यानंतर काही दिवसात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांकडून अपीलकर्त्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर छत्तीसगड उच्च न्यायालयाने अपीलकर्त्यांना हत्येसाठी दोषी ठरवलं होतं. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला अपीलकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.