मुख्यमंत्र्यांची शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेत कार्यकर्ते पळवण्याची स्पर्धा लागली असून, कोण कुठल्या गटाचा हेच समजेनासे झाले आहे. यातच शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे या दोघांच्याही कार्यकारिणीत दोन पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने चांगलाच गोंधळ वाढला आहे. शिंदे सेनेने काल जाहीर केलेल्या कार्यकारिणीत कामठीचे संघटक म्हणून विठ्ठल जुमडे यांची नियुक्ती केली. मात्र, जुमडे यांनी आपण उद्धव सेना सोडली नसल्याचे जाहीर करून नागपूर ग्रामीणचा तालुका प्रमुख असल्याचे सांगितले. दुसरीकडे शिंदे सेनेने उमरेड तालुका प्रमुख नेमलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुद्धा आपण उद्धव ठाकरेंच्या सेनेतच असल्याचे सांगून शिंदे सेनेत जाणार नसल्याचे पत्र दिले आहे.