औषधांची अवैध विक्री 52 लाख रुपयांची औषधं जप्त

मुंबई, 27 जानेवारी : राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबई उपनगर विभागात मोठी कारवाई करत सुमारे 52 लाख 27 हजार रुपयांची औषधं जप्त केली आहेत. बोरिवलीतील भगवती रुग्णालय या ठिकाणी बॉडी बिल्डिंग आणि सेक्स पॉवर वाढवण्यासाठीच्या या गोळ्या अवैध पद्धतीने विकल्या जात असल्याचं उघड झालं. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयातील गुप्तवार्ता विभागास औषधांची बेकायदेशीर विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर बृहन्मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी  24 जानेवारी रोजी सापळा रचला. बनावट ग्राहक पाठवून त्यांनी स्टिरॉईड आणि लैंगिक क्षमता वाढवण्याच्या गोळ्या विकणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडलं. या व्यक्तीकडे चौकशी केली असता ही अवैध औषधे कोशेर फार्मास्युटिकल्स नावाच्या फर्ममधून पुरवली जात असल्याचे निष्पन्न झाले. अन्न व औषध विभागाने बोरिवली येथील आनंद अपार्टमेंट एसव्ही रोड येथे असलेल्या या फर्मवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात लैंगिक शक्ती वाढवणारी औषधे जप्त केली. या फॉर्ममध्ये ही औषधे ठेवण्याचा व विक्री करण्याचा परवानाही नाही. अन्न व औषध विभागाच्या म्हणण्यानुसार ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतली जाऊ शकतात.

अन्न व औषध विभागाने जप्त केलेल्या सेक्स पॉवर आणि बॉडी बनवण्याच्या या बेकायदेशीर औषधांची बाजारात किंमत सुमारे 52 लाख आहे. हे रॅकेट किती मोठे आहे आणि ही औषधे बेकायदेशीररीत्या कुठे आणि कुठे विकली जात आहेत, याचाही तपास अन्न व औषध विभागाकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *