बुलढाणा, 27 जानेवारी : नात्याने काका लागणाऱ्या नराधमाने बळजबरीने पंधरा वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार केले. हा सर्व प्रकार असह्य झाल्याने अखेर पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी आरोपीला बीड जिल्ह्यातील गेवराई येथून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2022 ते 23 जानेवारी 2023 दरम्यान या मुलीने मावशीचा पती असलेल्या नराधमाचा छळ सहन केला. जवळचा नातेवाईक असल्याने त्याचे पीडितेच्या घरी येणे जाणे होते. त्याचा गैरफायदा घेत त्याने तिला जाळ्यात ओढले. तिच्या शाळेत जाऊन भेटणे सुरू केले. एके दिवशी तिला बुलढाण्यातील एका ‘लॉज’मध्ये नेऊन त्याने बळजबरीने शारीरिक अत्याचार केला. यामुळे त्रस्त मुलीने अखेर चिखली पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला गेवराई येथून अटक करून त्याच्याविरुद्ध पोक्सो, बलात्कार व विनयभंगच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे.