नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील सर्व 124 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात 39 हजार 393 मतदार असून नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या पाच जिल्ह्यात सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान होणार आहे. नागपूरच्या अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच शिक्षकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे यंदा चांगलं मतदान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिक्षक मतदारसंघात पसंती क्रमांकानुसार मतदान करायचे असून निवडणूक आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या जांभळ्या रंगाच्या पेनाने उमेदवारांसमोर पसंती क्रमांक द्यायचे आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला मतदान करायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने ही अनेक मतदान केंद्रांसमोर रांगा दिसून येत आहे.
गळाभेट घेत सुधाकर अडबाले आणि नागो गाणार यांच्या एकमेकांना शुभेच्छा
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे दोन्ही प्रमुख उमेदवार म्हणजेच सुधाकर अडबाले आणि नागो गाणार मोहता सायन्स महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर एकत्रित आले. दोघांनी गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि पुढील प्रवासाला निघाले. सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचा तर नागो गाणार यांना भाजपचा पाठिंबा आहे.
आम्हाला विजयाचा पूर्ण विश्वास : सुधाकर अडबाले
विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघाचे सुधाकर अडबाले यांनी सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांना भेटी देणं सुरु केलं आहे. मतदान सुरु होताच त्यांनी नागपूरच्या मोहता सायन्स कॉलेज इथल्या मतदान केंद्रावर हजेरी लावली. महाविकास आघाडीने अखेरच्या क्षणी पाठिंबा जाहीर केला असला तरी आम्ही सहाही जिल्ह्यात मतदार शिक्षकांपर्यंत पोहोचू शकलो, त्यामुळे आमचा प्रचार चांगला झाला आहे. आम्हाला विजयाचा पूर्ण विश्वास आहे, असे अडबाले म्हणाले. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या मतांमध्ये कुठेही मत विभाजन होणार नाही. या मतदारसंघात चुरस फक्त विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघाचे सुधाकर अडबाले आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांच्यात असल्याचा त्यांचा दावा आहे, असं सुधाकर अडबाले म्हणाले.