नागपुर, दि.०६। प्रतिनिधी भाजपमधून आलेल्या नाना पटोले यांना चार वर्षात आठ महत्त्वाची पदं का दिली गेली असा सवाल काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी विचारला आहे. राज्यात इतर नेत्यांमध्ये योग्यता नाही का? एकाच नेत्याचे एवढ्या वेळा लाड का पुरवले जातात? असे सवालही आशिष देशमुख यांनी उपस्थित केले आहेत. गावागावात रुजलेली काँग्रेस आणि त्यामध्ये नेतृत्वाची खाण असताना वारंवार एकच हिरा (नाना पटोले) बाहेर का निघतो? यामागचा काय राज आहे? हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कळत नाही. कदाचित पक्षश्रेष्ठींना कळत असावं असा टोलाही आशिष देशमुख यांनी लगावला आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या वरिष्ठ आणि समजूतदार नेत्याला त्रास देण्याचा काम नाना पटोले यांनी केलं आहे, म्हणूनच थोरात यांनी विद्यमान प्रदेशाध्यक्षांसोबत काम करणं कठीण झालंय असं मत व्यक्त केल्याचंही आशिष देशमुख म्हणाले. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, सत्यजित तांबेंसारख्या तरुण तडफदार नेत्याला काँग्रेसपासून दूर करण्यात आलं. चांगल्या तरुण नेत्यांना काँग्रेसपासून दूर करण्याचं कामच नाना पटोले महाराष्ट्रात करत आहेत. सत्यजित तांबे यांच्यासोबत धोका झाला.