डोंबिवली, दि.०७। प्रतिनिधी डोंबिवलीच्या गांधीनगर परिसरात महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्याने हाजारो किलो गॅस वाया गेला आहे. तब्बल दोन तासानंतर महानगर गॅसचे अधिकारी आणि इमर्जन्सी व्हॅन घटनास्थळी आल्यामुळे नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. डोंबिवली मधील गांधीनगर परिसरात एका इमारतीचे काम सुरू असून जेसीबीने खणण्याचे काम सुरू असताना सायंकाळी ५ ते ५.१५ च्या सुमारास महानगर गॅसची पाइपलाइन फुटली. गॅसचा प्रेशर जास्त असल्याने मोठ्याने आवाज येऊ लागला. तेथील लोकांना त्यावेळी आधी काही कळेलच नाही, मात्र गॅस वास येऊ लागल्याने समजले. दरम्यान गॅस लाइन फुटल्याचे समजताच जेसीबी चालकाने पळ काढला. मोठा आवाज आणि परिसरात वास परसल्याने मनसे कार्यकर्ते शशिकांत कोकाटे आणि मिलिंद म्हात्रे हे घटनास्थळी पोहोचले. कोकाटे यांनी तात्काळ याची माहिती अग्निशमन दलाल दिली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी केली. परंतु अत्यावश्यक सेवा येण्यास तास-दीड तासाचा कालावधी लागेल असे सांगण्यात आले. त्यामुळे स्थानिक नागरिक कोकाटे यांनी गॅस लाइनचा वॉल शोधून त्या कार्यालयाची चावी बनविण्यास सांगितले. तेवढ्यात सायंकाळी पावणे सातच्या सुमारास महानगरकडून या लाइनवरील गॅस पुरवठा बंद करण्यात आला. मात्र तो पर्यत हजारो किलो गॅस वाया गेला आहे. त्यानंतर महानगरचे कर्मचारी हे घटनास्थळी आले आणि पाइपलाइन गळती झालेल्या ठिकाणी एन्ड कॅप बसविण्यात आली आहे. हे काम पूर्ण होऊन गॅस पुरवठा सुरळीत सुरू होण्यास कालावधी लागू शकतो असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान महानगर गॅस पुरवठा बंद असल्याने नागरिकांना सायंकाळी जेवण बनविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.