२०२४ मध्ये काँग्रेस भाजपला धक्का देणार

नवी दिल्ली, दि.०७। प्रतिनिधी देशातील सर्वच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. परंतु यादरम्यानच सी-व्होटर आणि इंडिया टुडेने केलेल्या सर्वेक्षणात आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमुळे देशातली राजकीय गणितं बदलण्याची शक्यता सर्वेतून पुढे आली आहे. या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार यूपीएच्या मतांमध्ये आणि जागांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेने पक्षासाठी केवळ राजकीय वातावरण तयार केलं नाही तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रीब्रँडिंगलाही मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. यासोबतच देशभरातील लोकांना जोडण्यासाठी भारत जोडो यात्रेकडे काँग्रेसची चांगली रणनीती म्हणून पाहिले जात आहे, असे या सर्वेतून दिसून आले आहे.

सर्वेक्षणानुसार २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला ३८ टक्के आणि यूपीएला २३ टक्के मते मिळाली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या मतांची टक्केवारी वाढून ४५ झाली होती. तर २७ टक्के लोकांनी यूपीएला मतदान केले होते. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांची तुलना केल्यास प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या मताधिक्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून देखील ही बाब दिसून आली आहे. जानेवारी महिन्यात समोर आलेल्या सर्वेक्षणानुसार सध्या निवडणुका झाल्या तर एनडीएला ४३ टक्के मतं मिळतील. तर यूपीएला ३० टक्के आणि इतरांना २७ टक्के मते मिळतील असा अंदाज आहे. भाजपच्या जवळपास सर्वच नेत्यांनी काँग्रेसमुक्त भारत करण्याची वक्तव्यं केली आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याचा अनेक वेळा उल्लेख केला आहे. परंतु, सी व्होटर आणि इंडिया टुडेच्या या सर्वेक्षणात पीएम मोदींचे हे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. सर्वेक्षणानुसार, ३७ टक्के लोकांचे मत आहे की काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेससाठी राजकीय वातावरण तयार झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *