अंकारा । तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे मृतांचा आकडा सतत वाढत आहे. भूकंपामुळे आतापर्यंत २१ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जसजसे कोसळलेल्या घरांचा ढिगारे हटवले जात असताना त्याखालून मृतदेह बाहेर येत आहेत. दरम्यान हवामानामुळे बचावकार्यातही मोठ्या अडचणी येत आहेत. रात्रीचे तापमान शून्याच्या खाली गेल्याने मदतकार्य थांबवावे लागत आहे. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे प्रभावित झालेल्यांच्या लोकांच्या मदतीसाठी जगातील अनेक देश पुढे आले आहेत. आतापर्यंत ७० हून अधिक देश यासाठी पुढे आले आहेत. जागतिक बँकेने तुर्कीला १.७८ बिलीयन डॉलर्सचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. अनेक देशांनी या देशांना मदत सामग्रीही पाठवली आहे. अमेरिकेने दोन्ही देशांना ८५ मिलीयन डॉलर्सची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भारताने देखील संकटात सापडलेल्या तुर्कीला मदतीचा हात दिला आहे. भारताकडून छऊठऋ च्या तीन पथके तसेच मदतीचं साहित्य तुर्कीमध्ये पाठवण्यात आले आहे.