महाराष्ट्राचे कालपर्यंतचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राजीनामा दिल्लीेशरांनी स्वीकारला. राजीनामा दिल्यानंतर कोश्यारी शांतपणे बसले होते. दिल्लीवरून आदेश आला आणि म्हटले उठ, राज्यपाल महोदय उठले आणि नव्या राज्यपालांना म्हटले गेले बैस, ते बसले. आता ही उठ”बैस’ झाल्यावर जुन्या राज्यपालांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने आज पारित केला. गेलेले राज्यपाल आणि आलेले राज्यपाल यांची तुलना करणे आपले काम नाही. मात्र ज्याप्रमाणे राष्ट्रपतीचे पद सर्वोच्च असले तरी खरे अधिकार पंतप्रधानांचे असतात, असा आजपर्यंतचा शिरस्ता होता. तीच परिस्थिती राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याबाबत होती. मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच राज्यपालांनी वागायचे असते. पण गेल्या काही वर्षांत राज्यपाल विरोधी पक्षाच्या मंत्रिमंडळाला सळो की पळो करून सोडतात, असे दिसून आले आहे. लोकशाहीत सरकार कोणाचेही असले तरी शक्य तोवर एक दुसऱ्याबद्दल कटुता येऊ नये, असा प्रयत्न होताना दिसत नाही. काँग्रेसच्या काळात मनात आले आणि राज्य सरकार बरखास्त झाले असे अनेकदा दिसून आले आहे. १९८० साली इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकार बरखास्त केले होते.
इंदिराजींनी इतर अनेक सरकारे बडतर्फ केली होती, हा इतिहास आहे. इंदिरा गांधी यांना हरवून सत्तेवर आलेल्या जनता सरकारनेही तेच केले होते. आता मोदी सरकार अस्तित्वात आल्यावर एकही राज्य सरकारची बरखास्ती झाली नाही. मात्र ज्या राज्यात डबल इंजिन सरकार नाही तेथे राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा कलगीतुरा चालूच असतो. कोश्यारी गेले आणि नवे राज्यपाल रमेश बैस महामहिमपदी बैसले यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा प्रभाव पडणार नाही. भगतसिंह साहेबांनी आपल्या नावाप्रमाणे राज्यपालपदावर अतिशय क्रांतिकारी काम केले असेच म्हणावे लागेल. अनेक पुस्तकांची प्रकाशने, कोणत्याही लहानमोठ्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणे आणि राजभवन जनताभवन करण्याचा धर्म त्यांनी निभावला. डबल इंजिनचे सरकार होणार आहे असे म्हटल्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता नव्या मुख्यमंत्र्यांना शपथ दिली.
निवडणूक झाल्यावर मंत्रिमंडळ स्थापनेबाबत पेचप्रसंग उभा झाला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे शरद पवार यांच्या सल्ल्याने पहाटेचा शपथविधी पार पडला होता. तो पार पडला आणि मग राष्ट्रपती राजवट संपल्यामुळे राज्यपालांना महाआघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शपथ देणे भाग पडले होते. राष्ट्रपती राजवट संपवून फडणवीस, पवार यांचे सरकार आले नसते तर राष्ट्रपती राजवट संपलीच नसती, असा होरा अनेकांनी बांधला होता. त्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचा कलगीतुरा सुरूच होता. राज्यपाल आपले ऐकत नाहीत ना, मग त्यांच्यासाठी विमान उपलब्धही ठेवले गेले नव्हते, हाही इतिहास आहे. तेव्हाच्या नव्या सरकारने विधानपरिषदेसाठी पाठविलेल्या बारा नावाचे बारा वाजविण्याचे काम काहीही न बोलता कोश्यारी साहेबांनी मस्तपैकी करून टाकले होते. आता ते आपल्या माहेरी गेले आहेत. आता तिथे त्यांना भरपूर वेळ मिळेल आणि ते लहानमोठे भरपूर कार्यक्रम करू शकतील. आता गोष्ट नव्या राज्यपाल साहेबांची. बैस साहेब सिंगल इंजिनच्या सरकारात राज्यपाल होते. ते आता डबल इंजिनच्या सरकारातील राज्याचे राज्यपाल बनले आहेत. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारचे प्रकरण पडून आहे. त्याची सुनावणी सुरू आहे. सरकारच्या भवितव्याबद्दल आपण चांगले चांगले चिंतुया आणि मनात कोणताही किंतु परंतु न ठेवता रमेश बैस साहेबांना फारसे कष्ट पडू नयेत, अशी आशा करूया. नव्या राज्यपाल महोदयांचे मनःपूर्वक स्वागत.