भारतात टाटांचे नाव आदराने घेतले जाते. टाटा भारतातील क्रमांक एकचे उद्योगपती असले तरी त्यांचे साम्राज्य गेल्या चार-आठ वर्षांत तितकेसे विस्तारलेले नाही. अतिशय व्यावसायिक प्रबंधन, कर्मचाऱ्यांसाठी कंपनीचे समर्पण आणि चांगल्या कामांसाठी संपत्ती अर्पण असे टाटांचे काम आहे. या टाटांनीच भारतात एअर इंडियाची स्थापना केली होती. ज्या काळात विमानात उडण्याचे स्वप्न बडे बडे लोक पाहूही शकत नव्हते त्याकाळात टाटांनी या क्षेत्रात पदार्पण केले होते. सरकारने एयर इंडिया कंपनीचे राष्ट्रीयीकरण केल्यानंतर एयर इंडियाची एअर हळूहळू फुसफूस करत निघू लागली आणि अखेर हजारो कोटी रुपयांच्या तोट्यात एअर इंडिया पार गाळात रुतत गेली. या एअर इंडियाला विकण्यासाठी सरकारने जंगजंग प्रयत्न केले पण तोट्यातील कंपनीला कोण विकत घेणार?
या सरकारने अनेक मलईदार कंपन्याही विक्रीस काढल्या आहेत. असा नफा देणाऱ्या कंपन्या अलगद अदानी साहेबांनी अल्प किंमतीत विकत घेतल्या. टाटा यांच्या पूर्वजांचे एअर इंडियावर पुत्रवत प्रेम होते. इंदिराजींनी जेव्हा याचे राष्ट्रीयीकरण केले तेव्हा टाटांनी जड मनाने या कंपनीचा निरोप घेतला होता. अशी एअर इंडिया टाटांच्या गळ्यात बांधण्यासाठी सरकार एका पायावर तयार होते.
आम्ही वर म्हटल्याप्रमाणे एअर इंडियाचा सौदा कोणताही लहानसहान उद्योगपती करू शकला नसता. त्यात टाटांच्या सर्व कंपन्यांकडे कधीच बेकायदेशीर व्यवहार होत नव्हते. त्यामुळे तोट्यातील या महाराजाचे राज्य गेल्यावर पार पाताळात जाण्याची अवस्था आली असती. ज्याप्रमाणे महाराणा प्रताप यांना त्याकाळी भामा शाह यांनी प्रचंड संपत्ती देऊन पुन्हा उभे केले त्याचप्रमाणे रतन टाटा यांनी या महाराजाला त्याचा रुबाब परत मिळवून देण्यासाठी कंबर कसलेली दिसते.
काल ग्लोबल एव्हीएशनच्या इतिहासातील सर्वांत मोठे यात्री विमान खरेदी करण्याचा आदेश टाटा यांनी दिला. ही कंपनी चारशे सत्तर विमानांची खरेदी करणार आहे. या विमानात विशेष करून अत्याधुनिक रोल्स-राईस ुुल इंजिन लागणार आहे. भविष्यकाळात भारताला दोन हजार पेक्षा जास्त विमानांची गरज पडणार आहे. रतन टाटा यांनी जगातील सर्वांत मोठा सौदा करून टाटा म्हणजे काय चीज आहे हे दाखवून दिले आहे. भारतातील एका पावसाळी छत्र्यांप्रमाणे उगवलेल्या उद्योगपतींची काय गत झाली आहे, हे आपण बघतोच आहोत. अशावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि फ्रान्सचे अध्यक्ष एम्युनल मॅक्रोन यांच्या उपस्थितीत ही विमाने विकत घेण्याचे आदेश दिले आहेत. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सूनक यांनी याला लँडमार्क डील म्हटले आहे. एअर इंडियाच्या महाराजाप्रमाणे हा सौदाही राजेशाही थाटातच झालेला आहे. भारतात अमेरिका आणि फ्रान्स यांच्या कंपन्यांकडून नवी विमाने याच वर्षांत एअर इंडियाच्या ताफ्यात सामील होणार आहेत. विस्ताराच्या मोठ्या कार्यक्रमानंतर नवी विमाने येईपर्यंत एअर इंडिया बोइंग आणि एअर बस भाड्याने घेणार आहेत.
थोडक्यात टाटा यांच्या ताब्यात आल्यावर ‘टाटागिरी’ काय असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. टाटा यांच्या अन्य कंपन्यांप्रमाणे एअर इंडियातही अनेक मोठे बदल नक्कीच होतील. आजच्या घडीला लुफ्टन्सा आणि सिंगापूर एअरलाईन्स या दोन जागतिक स्तरावर अग्रेसर कंपन्या आहेत. आता एअर इंडियाचा महाराजा त्यांच्या बरोबरीने आपला दरबार थाटणार आहे. यामुळे केवळ भारताचेच नाव उंचावेल असे नाही तर अमेरिका आणि फ्रान्स येथेही लाखो लोकांना रोजगार मिळेल. आता यापुढे विदेशी विमानांनी प्रवास करण्यापूर्वी भारतातील हवाई प्रवासीसुद्धा लवकरच एअर इंडियाला पहिली पसंती देतील यात वाद नाही. राजकारणात जसे मोदी है तो मुमकीन है असे म्हणतात त्याचप्रमाणे हवाई प्रवासात टाटा है तो मुमकीन है हा नवा वाक्यप्रचार रूढ होईल. टाटायानाचे विस्तारीकरण भारताच्या शिरात मानाचा तुरा आहे, असे समजले पाहिजे. भारताचे ‘रतन’ रतन टाटा यांना या टाटायानाच्या खरेदीसाठी मनःपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत.