निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी शिवसेनेची कार्यालये ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात आज (सोमवारी) विधिमंडळाचे शिवसेना कार्यालय ताब्यात घेऊन करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले, आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिंदे गटातील ज्येष्ठ आमदार आज (सोमवारी) सकाळी विधिमंडळातील शिवसेना कार्यालयात पोहोचले. या नेत्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा देत शिवसेना कार्यालयावर ताबा मिळवला. सर्वोच्च न्यायालयाने जो प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपवले होते. दोन दिवसांपूर्वीच आयोगाने त्यावर निकाल दिला आहे. यामुळेच आज आम्ही विधिमंडळाच्या शिवसेना कार्यालयात प्रवेश केला आहे, असे शिवसेनेचे प्रमुख प्रतोद भरत गोगावले म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदारांनी विरोध केला तर काय होईल? त्याला उत्तर देताना गोगावले म्हणाले की, हा जर- तरचा प्रश्न आहे. त्यांनी विरोध केल्यावर आम्ही त्यांना उत्तर देऊ. मुख्यमंत्री शिंदे यांचे आमदार आज शिवालय आणि शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालयही ताब्यात घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळेच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती.