पुणे, दि.२३। प्रतिनिधी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात येत आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विट करून माहिती दिली. एमपीएससीच्या नवीन शैक्षणिक पॅटर्ननुसार यंदाच्या वर्षापासून परीक्षा घेण्यास विद्यार्थ्यांनी विरोध करत पुण्यात आंदोलन सुरू केले. वेळोवेळी आंदोलन करूनही सरकारने दखल न घेतल्याने सोमवारी सकाळपासून बालगंधर्व चौकात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या ओशासनानंतरही विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले नाही. अखेर आज या विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आले आहे. काल रात्री साडेअकरा वाजता विद्यार्थी आंदोलकांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोग, विद्यार्थी प्रतिनिधींची घेण्याचे ठरले होते. ही बैठक आज नियोजित होती. मात्र बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर आता बैठक न घेता आयोगाने आज विद्यार्थ्यांच्या बाजुने निर्णय दिला आहे.