नवी दिल्ली, दि.२८। वृत्तसंस्था सर्वोच्च न्यायालयात आज दोन्ही गटांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. पहिल्या सत्रात ठाकरे गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर दुपारनंतर शिंदे गटाकडून नीरज किशन कौल यांनी युक्तीवाद केला. मात्र, या युक्तीवादात घटनापीठाच्या न्यायमूर्तींनी अनेक प्रश्न उपस्थित केले. एकवेळ शिंदे गटाचे वकील कौल यांनी आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा युक्तीवाद केला. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी “तुम्ही शिवसेना आहात की नाही, हे विधीमंडळात ठरू शकत नाही,’ अशी टिप्पणी केली. त्यामुळे दुपारच्या सत्रात मोठ्या प्रमाणात सवाल-जवाब रंगला.
आज दिवसभरात सुरुवातील ठाकरे गटाकडून अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त निकम यांनी युक्तीवाद केला. त्यात त्यांनी राज्यपाल त्यावेळीचे निर्णय कसे चुकीचे होते, यावर भर दिला, तर निकम यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडींसदर्भाने प्रश्न उपस्थित केले. त्याला शिंदे गटाकडून नीरज किशन कौल यांनी उत्तर दिले. राज्यपालांची कृती पूर्णपणे नियमानुसार होती, असा युक्तीवाद त्यांनी केला. त्यासाठी बोम्मई प्रकरणाचा दाखल दिला. तसेच, हे प्रकरण पक्षांतर बंदी कायद्याचे नाही. सगळा मुद्दा हा पक्षांतर विरोधाचा, पक्षांतर लोकशाहीचा आहे. यात पक्षांतर बंदी आणि पक्षांतराचे कुठलेही मुद्दे नाहीत. असाही दावा त्यांनी केला. या वेळी घटनापीठाच्या न्यायमूर्तींनी अनेक प्रश्नांचे बाऊन्सर कौल यांच्यावर टाकले. त्यांच्यात रंगलेले हे सवाल-जवाब.