भीषण अपघातात २६ जणांचा मृत्यू, ८५ जख्मी

अथेन्स , दि.०१। वृत्तसंस्था भरधाव वेगात असलेल्या ट्रेनने समोरून येणाऱ्या मालगाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की दोन्ही ट्रेनने पेट घेतला. या भीषण अपघातात २६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर ८५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्देवी घटना ग्रीसमधील लॅरिसा शहरात घडली. या भीषण अपघाताचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ट्रेनमधील सुमारे २५० हून अधिक प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. तसेच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आतापर्यंत या अपघातात जवळपा २६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ग्रीसमधील प्रवाशांनी भरलेल्या ट्रेन अथेन्सहून उत्तरेकडील थेस्सालोनिकी शहराकडे निघाली होती. त्याचवेळी मालगाडी थेस्सालोनिकीहून लॅरिसालाच्या दिशेने येत होती. दरम्यान, लॅरिसा शहरानजीक परिसरात दोन्ही ट्रेन समोरासमोर आल्या. प्रवासी ट्रेनचा वेग जास्त असल्याने लोको पायलटला ट्रेनचे आपत्कालिन ब्रेक दाबणे अशक्य झाले. काही कळण्याच्या आतच दोन्ही ट्रेनची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, प्रवासी ट्रेनचे पहिले चार डब्बे रुळावरून खाली घसरले. अपघातानंतर क्षणातच दोन्ही ट्रेनने पेट घेतला. या भंयकर घटनेत २६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर ८५ जण जखमी झाले. जखमींपैकी १४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान, शहरानजीक हा अपघात झाल्याने स्थानिक पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रेनमधील प्रवाशांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *