आज पुण्यातील भाजपच्या दोन रिक्त जागांच्या निवडणुकीचे निकाल लागले. कसबा पेठ आणि चिंचवड या दोन मतदारसंघातील भाजपच्या आमदारांचे निधन झाल्यामुळे या पोटनिवडणूका घेण्यात आल्या होत्या. यापैकी चिंचवड हा आमदार जगताप यांचा बालेकिल्ला होता. त्यामुळे चिंचवडची निवडणूक जगताप यांच्या पत्नीला जिंकणे तेवढे अवघड नव्हते. पण तरी अपक्ष आमदाराने जरी ४४ हजार एवढी जास्त मते खाल्ली नसती तर ती निवडणूकही भाजपला जिंकता आली नसती, असे निकालाचा अभ्यास केल्यावर दिसून येते. कसबा पेठ हा तर भाजपचा अनेक दशकांपासूनचा बालेकिल्ला होता.
मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे टिळक परिवारातील कोणाला तरी ही जागा मिळेल, असा सर्वांचा सरावांचा व्होरा होता. पण त्यांना डावलल्यामुळे टिळक परिवार आणि त्यांना मानणाऱ्यांमध्ये फारसा उत्साह या निवडणुकीत दिसून आला नाही. काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पूर्ण पाठिंबा दिला. धंगेकर यांची प्रतिमाही लोकप्रिय माणूस अशीच होती. याउलट रासने यांच्याबद्दल कट्टर भाजपवालेही काहीसे नाराज होते. एका लहानशा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अर्ध मंत्रिमंडळ पुण्यात कष्ट घेत होते.
संपूर्ण यंत्रणा शिस्तशीरपणे राबविण्यात आली होती. पण तरी अकरा हजर मतांनी लाजिरवाणा पराभव झेलावा लागला. ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी नाही. विधानपरिषदेचे आधीचे निकालही दिलासादायक नव्हते. या निकालामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजपने गतिमान सरकारच्या मोठमोठ्या जाहिराती करूनही जनतेने आपला पराभव का केला याचा विचार भारतीय जनता पक्षाला गंभीरपणे करावा लागेल.
एखाद्या पोटनिवडणूकिसाठी ज्या पोटतिडकीने प्रचार करण्यात आला त्यावरून भाजपश्रेष्ठींना येथे धोका होऊ शकतो याची आधीच कल्पना आली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षापासून सर्वच महत्त्वाचे नेते पुण्यावर लक्ष ठेऊन होते.
सध्याचे सरकार निश्चितपणे गतिमान आहे. परंतु शिवसेनेची फूट ज्या पद्धतीने करण्यात आली त्यामुळे दृश्य फायदा सध्याच्या सरकारला दिसत असला तरी अदृश्य तोट्याचा विचार सत्तापक्षाला गंभीरपणे करावा लागेल. केवळ मोठमोठ्या वृत्तपत्रात मोठमोठ्या जाहिराती देऊन निवडणुका जिंकता येत नाहीत, हे या निवडणुकीने दाखवून आहे. चिंचवडमध्ये दिवंगत सदस्यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यामुळे व त्या मतदारसंघात त्यांचे चांगलेच काम असल्यामुळे त्यांचा विजय पक्का होता.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विरोध म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी पक्ष उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे तेथील भाजप उमेदवाराचा विजय निश्चित होता. कसब्यातील मतदारांनी कस लावून धंगेकर यांना निवडून दिले आहे. ही आमदारकी मुदतपूर्व निवडणुका झाल्या नाहीत तरी धड दोन वर्षांचीही नाही. पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीत या मतदारसंघावर आतासारखे लक्ष केंद्रीत करता येणार नाही. पुन्हा उमेदवार बदलला तरी पंचाईत होण्याची शक्यता आहे. म्हणजे धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी एकूण परिस्थिती आहे.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा लोकसभेची निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. ४८ खासदार देणाऱ्या महाराष्ट्राला देशात महत्त्वाचे स्थान आहे. तिकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या फुटीवर किंवा तुटीवर न्यायालयात देशातील बडेबडे वकील युक्तिवाद करीत आहेत. सरन्यायाधीशाच्या सूचनेप्रमाणे या प्रकरणाचा निकाल आजच अपेक्षित होता. पण पुढच्या आठवड्यात काय होईल हेही सांगता येत नाही. अजून राज्याचे मंत्रिमंडळही पूर्ण करण्यात आलेले नाही. यामुळे आजचा निकाल अनपेक्षित नसला तरी भारतीय जनता पक्षासाठी वेदनादायक आहे यात वाद नाही.