मुंबई, दि.०७। प्रतिनिधी भाजप तुमचा वापर करत आहे. पोलिसांचा वापर करत शिवसैनिकांवर हल्ला करून तुम्ही शाखा ताब्यात घेत असाल, तर ते मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला शोभणारे नाही. भविष्यात तुम्हाला तुम्ही किती मोठी चूक केलीय ते कळेल, असे खडेबोल खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले. भगवा रंग आम्हाला प्रिय आहे. मात्र, कोणत्याही रंगाची मक्तेदारी कोणाकडे नाही. कोणता रंग कोणाची मोनोपॉली नाही. मात्र, शिवसेना प्रमुखांनी आम्हाला भगव्यावर प्रेम करायला शिकवल्याचेही त्यांनी सांगितले. ठाण्यात शिवसेनेची शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतली आहे. त्यानंतर पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. येणाऱ्या काळात हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, ज्या प्रकारे पोलिस, सत्तेचा वापर करून जे काही ते ओढून नेत आहेत, ते आम्ही वापस आणू. ही काही दिवसांची गोष्ट आहे. ना ही सत्ता राहील, ना ही दादागिरी राहील. आमच्या लोकांविरोधात पोलिसांचा वापर होतोय, याचा अर्थ तुम्ही घाबरले आहात. मर्द असाल, तर आमच्यासमोर येऊन आमच्याशी सामना करा. पाहून घेऊ. सरकार तर पडेलच. फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहा.